maharashtra

सांगलीत आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

Share Now


सांगली : कोरोनाने धारण केलेले भयावह रुप अतिशय गंभीर वळणावर आलेले असतानाच स्थानिक प्रशासन आता अधिकाधिक कठोर निर्णय घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम राज्यात लागू असतानाच आता हे निर्बंध सांगलीत आणखी कठोर केले जाणार आहेत. जिल्ह्यात आठ दिवसांच्या सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा खुद्द पालकमंत्री जयंत पाटील यांनीच केली आहे.

लॉकडाऊन हा जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. सांगली जिल्ह्यात 5 मे रोजी मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाशी चर्चा करून घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा पाहता ही साखळी तोडण्यासाठीच हा निर्णय घेतला जात असल्याचे म्हणत त्यांनी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

आपल्याला तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच कोरोनावर मात करायची असल्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा, असे भावनिक आवाहनही जयंत पाटील यांनी नागरिकांना केले. दरम्यान 1 मे पासून पालकमंत्री जयंत पाटील हे सांगलीतच असून, परिस्थितीचा अतिशय जवळून आढावा घेत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, रुग्णसंख्या, बेड्सची उपलब्धता, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सर्व गोष्टींवर ते लक्ष ठेवून आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि अन्य भागात कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. या ठिकाणीही सलग दोन दिवस बैठक घेत कोरोना नियंत्रण आणण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशही जयंत पाटील यांनी दिले आहेत.

The post सांगलीत आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2RlTBnk
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!