maharashtra

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनच हवा – ‘एम्स’ संचालक

Share Now


नवी दिल्ली – सध्याच्या गतीनेच कोरोना पुढे पसरत राहिला आणि रोगप्रतिकारक शक्तीला नव्या स्ट्रेनने चकमा देणारी कार्यपद्धती विकसित न केल्यास देशात तिसरी लाट येऊ शकते, असा भीतीवजा इशारा दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन उपयोगी नसून, कोरोनाची साखळी तोडायची असेल, तर कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता असल्याचे गुलेरिया यांनी स्पष्ट केले.

इंडिया टुडे वृत्तवाहिनीला ‘एम्स’चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील परिस्थिती, त्यामागील कारणे, नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन आणि कडक लॉकडाऊन लागू करण्याबाबत भूमिका मांडली.

डॉ. गुलेरिया म्हणाले, आता आपल्याला तीन गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. पहिली म्हणजे रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे. दुसरी, आक्रमक कार्यपद्धती स्वीकारून रुग्णसंख्या कमी करणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन करणे. आपल्याला विषाणू संसर्गाची साखळी तोडावी लागणार आहे. आपण जर माणसा माणसांतील संपर्क टाळू शकलो, तर रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता असल्याचे गुलेरिया यांनी म्हटले आहे.

माणसांचा संपर्क टाळायचा म्हणजे आपण त्याला लॉकडाऊन म्हणू शकतो. युकेप्रमाणेच लॉकडाऊन लागू करावा लागेल. मग तो राज्य पातळीवर असो किंवा राष्ट्रीय पातळीवर. हे सगळे सरकारला ठरवावे लागणार आहे. कारण माणसाचे जीवन आणि त्याचा उदरनिर्वाह याची नीटपणे हाताळणी करण्यासंदर्भातील हा मुद्दा आहे आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याचाही. त्याचप्रमाणे दररोज मजूरी करून पोट भरणाऱ्याचाही मुद्दा आहे. पण, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडकडीत लॉकडाऊन आवश्यक असल्याचेही गुलेरिया यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर फक्त रुग्णालयातील पायाभूत सुविधांवर भर देऊन चालणार नाही, तर कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यावरही लक्ष द्यावे लागेल. वीकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू लागू करणे निरर्थक आहे.

आपण जर लॉकडाऊन लागू करण्याबद्दल म्हणाल, तर तो पुरेशा कालावधीसाठी असला पाहिजे. कमीत कमी दोन आठवड्यांसाठी तरी लॉकडाऊन हवा. हा लॉकडाऊन कडकडीत असायला हवा. जर रुग्णसंख्या लवकर घटली, तर आपण तो लवकरही उठवू शकतो, असेही डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले.

The post कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनच हवा – ‘एम्स’ संचालक appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3xGuCMd
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!