maharashtra

मोदींना रोखता आले असते भारतातील कोरोनाचे संकट, आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून मोदींवर परखड टीका!

Share Now


नवी दिल्ली – कोरोनाचे संकट भारतात थैमान घालू लागले आहे. त्यातच देशातील अनेक रुग्णांना ऑक्सिजनच्या अभावी आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्याचबरोबर रेमडेसिवीर आणि कोरोना लसीचा देखील मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला असताना १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांसाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर देशातील विरोधकांकडून आणि काही तज्ज्ञांकडून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील टीका केली जात आहे. यासंदर्भातील सविस्तर वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारतातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होण्यासाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले आहे.

अमेरिकेतील आघाडीचे वर्तमानपत्र असलेल्या न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या परिस्थितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अतिआत्मविश्वास कारणीभूत ठरल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे. या संकटासाठी मोदींचा अतिआत्मविश्वास आणि त्यांच्या नेतृत्वाची डॉमिनेटिंग शैली सर्वाधिक जबाबदार आहे. कोरोनाचे संकट असून देखील मोदींच्या प्रशासनाचा प्रयत्न हाच होता की भारताची पुन्हा सुस्थितीत आणि सर्वकाही सुरळीत झाले असल्याची प्रतिमा तयार केली जावी.

द गार्डियनने प्रकाशित केलेल्या आपल्या स्तंभलेखातून ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य केले आहे. भारतात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, ऑक्सिजन अभावी लोक मरत असताना अनेक राजकीय नेते मात्र त्याविषयी आवाज उठवणाऱ्यांवरच दबाव टाकत होते. ऑक्सिजन तुटवड्याविषयी आवाज उठवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. कारण त्यांच्यामते ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचे या स्तंभात म्हटले आहे. ऐन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या मध्यावर उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी जगातील सर्वात मोठा नदीकिनारी होणारा धार्मिक सोहळा, कुंभमेळा, भरवण्यास परवानगी दिली. त्यांच्या या निर्णयाला पंतप्रधानांचीही मंजुरी असल्याचे देखील यात म्हटले आहे.

कोरोनाचे हे संकट पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखता आले असते, पण तज्ज्ञ म्हणतात त्यांनी ते रोखले नसल्याचे म्हणत सीएनएनने मोदींवर निशाणा साधला आहे. भारतात १७ एप्रिल रोजी २ लाख ६१ हजार नवे कोरोनाबाधित सापडले. पण त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड मोठ्या जनसमुदायासमोर निवडणुकीच्या प्रचारसभेत मास्क न घालता सांगत होते की मी एखाद्या सभेमध्ये एवढी गर्दी कधीच पाहिली नसल्याचे सीएनएनने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

ब्रिटनच्या फायनान्शियल टाईम्सने छापलेल्या ‘द ट्रॅजेडी ऑफ इंडियाज सेकंड वेव्ह’ या लेखामध्ये तर इशाराच देण्यात आला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जोपर्यंत या संकटकाळासाठीची त्यांची जबाबदारी घेत नाहीत, तोपर्यंत देशभर अशाच चिता जळत राहतील. ऑक्सिजन अभावी लोक रुग्णालयाबाहेरच जीव तोडत असल्याची दृश्य ही कोरोनाचे संकट सुरू झाले तेव्हा वर्तवण्यात आलेल्या भीषण स्वरूपाचेच प्रतिरूप आहे.

मोदींच्या दृरदृष्टीविषयी फ्रेंच वर्तमानपत्र असलेल्या ला माँडेमध्ये छापून आलेल्या संपादकियामध्ये टिप्पणी करण्यात आली आहे. देशात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाण्यासाठी मोदींच्या दूरदृष्टीचा अभाव, अभिमान या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. २०२०मध्ये कोरोना संकटादरम्यान लॉकडाउन लागू करून पंतप्रधानांनी गरीब आणि स्थलांतरीत मजुरांवर मोठे संकट लादले होते. त्याच पंतप्रधानांनी आता आपली सर्वच शस्त्र खाली ठेवली असल्याचे यात म्हटले आहे.

भारतीय प्रसारमाध्यमांवर देखील टाईम मॅगझिनमध्ये छापून आलेल्या संपादकीयामधून टीका करण्यात आली आहे. देशातील अनेक हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिन्या, प्रादेशिक भाषेतील वाहिन्यांनी सातत्याने केंद्र सरकारच्या यशाचे अतिशयोक्तीपूर्ण वृत्तांकन केल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

The post मोदींना रोखता आले असते भारतातील कोरोनाचे संकट, आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून मोदींवर परखड टीका! appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3tjHgwW
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!