maharashtra

१०० दिवसाच्या लसीकरणबाबतचा आराखडा तयार करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री

Share Now


मुंबई : कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लातूरमध्ये यंत्रणा कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील प्रत्येकाचे लसीकरण करण्यावर भर देताना १०० दिवसाच्या लसीकरणबाबतचा आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

देशमुख यांनी मंत्रालयातून लातूर शहर विधानसभा आणि मतदारसंघ तसेच महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याच्या तसेच रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्याच्या कमी सर्वांनी सक्रिय होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रारंभी या बैठकीत सहभागी झालेल्या सर्वांच्या सूचना व म्हणणे पालकमंत्री श्री देशमुख यांनी ऐकून घेतले. कोविड प्रादुर्भावाच्या संदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या सोयीसुविधा, औषधाची उपलब्धता या संबंधाने उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने शंका समाधान केले.

सध्यातरी राज्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. राज्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. लातूरमध्येही दर दिवसाला १२०० पर्यंत रुग्णांची नोंद होत आहे. हे सर्व थांबण्यासाठी कडक लॉकडाऊनचे पालन आवश्यक असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले.

देशमुख म्हणाले की, येणाऱ्या काळात लसीकरणाची मोहीम अधिक सक्षमपणे राबविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत येत्या १०० दिवसात लातूरच्या नागरिकांचे लसीकरण कशापद्धतीने करण्यात येईल याबाबतचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

लातूर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचे जाळे अधिक सक्षम करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्याचा आरोग्य वैद्यकीय आराखडा तयार करण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य रुग्णालय, तालुका आणि जिल्हास्तरावरील रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या आरोग्य सुविधा याबाबतची माहिती यामध्ये असणार आहे. येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासनाने दुर्गम भागात शासकीय मदत पोहचविण्याबरोबरच नागरिकांचे लसीकरण आरोग्य सुविधा पुरविण्याबाबतचे नियोजन करावे.

मुंबई महानगरपालिकेमार्फत ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींसाठी ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशनची सोय उपलब्ध केली आहे. याच धर्तीवर लातूर महानगपालिकेमार्फत लातूर मध्ये अशी अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

आजही लातूरच्या काही भागात सकाळी ७ ते ११ या काळात अनावश्यक गर्दी होताना दिसत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी लातूर पोलीस प्रशासनाला कडक पावले उचलावी लागत आहे. हे टाळण्यासाठी आपण सर्वानी अनावश्यक गर्दी टाळणे गरजेचे आहे. यामध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लोकांना समजविण्यात पुढाकार घ्यावा.

The post १०० दिवसाच्या लसीकरणबाबतचा आराखडा तयार करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2RunYrt
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!