मुंबई:- गेल्या निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. मात्र, आम्ही त्या 105 आमदारांना घरी बसवले. आगामी निवडणुकीत शिवसेनेचेही एवढे आमदार निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावरुन केशव उपाध्ये यांनी राऊत यांना लक्ष्य केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 105 जागा जिंकू, अशा गप्पा शिवसेनेकडून मारल्या जात आहेत. मात्र, पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला 105 जागा लढायला तरी मिळतील का, असा खोचक सवाल विचारत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केले.
संजय राऊत हे शिवसेना अजिंक्य असल्याचा दावा करतात. आम्ही भाजपच्या आमदारांना घरी बसवून सत्तेत आलो, असे ते वारंवार सांगतात. मात्र, याला विश्वासघात करणे म्हणतात. ज्या मित्र पक्षाच्या मदतीने तुम्ही निवडणूक जिंकलात त्यांचाच तुम्ही विश्वासघात केला, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे.
आगामी विधानसभेत 105 आमदार निवडून यायचं सोडा पण शिवसेनेला महाविकास आघाडीत तेवढ्या जागा तरी मिळतील का? महाविकास आघाडीत एकत्र निवडणूक लढवताना एवढ्या जागा मिळणार नाहीत, याची मानसिकता शिवसेनेने तयार करावी, असा सल्लाही उपाध्ये यांनी दिला आहे.
Add Comment