मराठवाडा महाराष्ट्र

केंद्रीय पथकाने अविृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून साधला शेतकऱ्यांशी संवाद

Share Now

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे मराठवाडयातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने उस्मानाबाद जिल्हयातील केशेगाव, पाटोदा, कात्री, अपसिंगा, माकणी आणि सास्तूर अदि गावांना भेटी देऊन तेथील नुकसान झालेल्या शेतातील पीकांची पाहणी करून शेतीच्या बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधला. या पथकाचे प्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव रमेशकुमार गंता, केंद्रीय वित्त विभागाचे सल्लागार आर.बी.कौल, ग्रामीण विकास विभागाचे यशपाल केंद्रीय कृषि विभागाचे कृषि संचालक आर.पी.सिंह, मुंबई येथील रस्ते व दळणवळण विभागाच्या प्रादेशिक कार्यालयातील मुख्य अभियंता तुषार व्यास, जलसक्ती विभागाचे अभियंता एम.एस.सहारे याच्यासह औरंगाबाद विभागाचे सहआयुक्त अविनाश पाठक, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे-पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी उमेश घाटगे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे आदीचा या दौऱ्यात समावेश होता.

या पथकाने प्रथम केशेगाव येथे साठवण तलावाची भिंत वाहून गेल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या साठवण तलावाची भिंत वाहून गेल्याने त्या परिसरातील सोयाबीन, ऊसाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील शेतकरी लखमाजी भगवान डोलारे यांच्याशी पथकातील अधिकाऱ्यांनी संवाद साधून त्याच्या भावना जाणून घेतल्या. त्याच बरोबर तलावाची भिंत वाहून गेल्याने मत्स्य व्यवसायिकांचेही मेाठया प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांच्याशीही पथकातील अधिकाऱ्यांनी चर्चा केली.

यानंतर केंद्रीय पथकाने उस्मानाबाद तालुक्यातील पाटोदा येथीलही नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. जिल्हयात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे शेत जमीन उखडून गेली त्यामुळे शेत जमीनीचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेत जमिनीच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारच्या एनडीआरएफच्या नियमानुसार जमिनीची दुरुस्ती आणि जमिनीच्या मशागतीसाठी मदत करावी तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेच्या नियमामध्ये सुट देवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा अशयाचे निवेदन आमदार पाटील यांनी यावेळी पथकास दिले.

केंद्रीय पथकाने तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा आणि कात्री येथे सोयाबीन, कांदा, द्राक्ष, तूर आणि टमाटेच्या पिकांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तसेच अपसिंगा येथील बंधारा वाहून गेल्यामुळे अर्चना युवराज पाटील यांच्या शेतात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या दोन्ही ठिकाणी पिकांसोबत इतर शेती साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी पथकासमोर सांगितले. यामध्ये मोटार, विहिरी, पाईपलाईन इतर शेती साहित्यबरोबरच जनावरेही वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी अपसिंगा येथे केंद्रीय पथकाने सुरेंद्र जगन्नाथ नकटे यांच्या द्राक्षांच्या बागेच्या नुकसानीची पाहणी केली. कात्री येथे सोयाबीन, कांदा, द्राक्ष,पपई आणि गवार आदी पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.. यावेळी शेतकरी बलभीम बाबुराव जमदाडे यांच्या शेताची पाहणी केली. लोहारा, तालुक्यातील माकणी, सास्तूर या गावाच्या परीसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची व जमिनीची पाहणी या पथकाने केली.


Share Now
error: Content is protected !!