महाराष्ट्र

अँड्रॉईड झूम ऍप्लिकेशन चा सदुपयोग – लाईव्ह काकड आरती

Share Now

सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक सोशल मीडिया माध्यमांचा उपयोग करून बरेच जण एकाच वेळी एके ठिकाणी लाईव्ह येत आहेत.. अनेक वेगवेगळ्या ऍपचा चांगला उपयोग करून घरच्या घरी बारसे, किंवा इतर छोटे कार्यक्रम केले जात आहे.. अशातच मी आणि माझी बहीण सौ. अमृता योगी आणि योगी कुटुंबियांसमवेत एका ऑनलाईन ऍप द्वारे लाईव्ह काकड आरतीचा उपक्रम लाईव्ह सुरू करायचा का अशी संकल्पना सुचली आणि मे 2020 पासून या उपक्रमाला सुरुवात केली.

गेली 20 वर्षे न चुकता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची काकड आरती एकादशीला नित्यनेमाने करतच होतो. अनेक साधक मंडळी आमच्याकडे न चुकता सकाळी 6 वाजता काकड आरतीला हजर असायची.. पण लॉकडाऊन काळात एकमेकांच्या घरी जाता येत नसल्यामुळे सर्वांना एकत्रित काकड आरतीचा लाभ मिळावा म्हणून ही कल्पना मला व माझ्या बहिणीला सुचली. आम्ही काकड आरतीचे काही व्हिडिओ सुद्धा ते ऍपद्वारे रेकॉर्ड करून ठेवले. भूपाळी, काकड आरती, पंचपदी आणि त्यानंतर फेर धरणे या क्रमाने साधारण एक ते दीड तास ही काकड आरती चालते.. यातील सगळी पदे आरत्या मी स्वतः म्हणतो आणि बाकीचे जण त्यांच्या पाठोपाठ म्हणतात किंवा श्रवण भक्ती करतात.. जमलेल्या सर्व मंडळींना काकड आरती म्हणता यावी म्हणून आरतीची पुस्तके pdf स्वरूपात तयार करून सर्वांना पाठवली आहेत.

🙂त्यानंतर आरतीस उपस्थित असलेल्या मंडळींपैकी एक जण गायनसेवा करतात. त्यानंतर काकड आरतीत सामील झालेला प्रत्येक जण आपला अनुभव सांगतो आणि अशा प्रकारे काकड आरती सोहळा संपन्न होतो. सुरुवातीला लाईव्ह काकड आरतीत सुद्धा 4 ते 5 जण सहभागी व्हायचे पण हळूहळू करत करत आता या उपक्रमास सहा महिने झाले आणि आता या उपक्रमात जवळपास 40 ते 50 जण नित्यनेमाने सहभागी होतात. 15 दिवसातून एक सकाळ भगवंताच्या साधनेत, उपासनेत आणि चिंतनात व्यतीत केल्यावर प्रत्येक साधकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रसन्नता आणि आत्मिक समाधान दिसून येते. तसेच दिवसाची सुरुवात प्रसन्नमय वातावरणात झाली की संपूर्ण दिवस चांगला जातो असे जमणा-या अनेक साधकांचा अनुभव आहे. या उपक्रमास संपूर्ण महाराष्ट्र, भारत देश इतकेच नव्हे तर विदेशातून सुद्धा काही मंडळी सहभागी होत आहेत. लॉकडाऊन संपून अजून पुढचे काही महिने सर्व परिस्थिती जोपर्यंत पूर्णपणे स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत किंवा त्याहीपुढे हे सुरूच ठेवण्याचा आमचा मानस आहे..😊

धन्यवाद!

©® – आनंद लेले


Share Now
error: Content is protected !!