महाराष्ट्र

मोदींवर टीका करणाऱ्या काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गेंना धमकी

Share Now


नवी दिल्ली – काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे आपल्याला धमकी मिळाल्याचा आरोप केला आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावरुन सुरु असलेल्या टीकेला उत्तर देत पहिल्यांदाच भाष्य केले. त्यांनी यावेळी काँग्रेसवरही निशाणा साधत टोला लगावला. यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांनी पत्रकार परिषद घेत मोदींवर टीका केल्यानंतर ही धमकी मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

यासंदर्भात काँग्रेस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींवर टीका केल्याने मल्लिकार्जून खर्गे यांच्यावर फोन करणारी व्यक्ती संतापली होती. मल्लिकार्जून खर्गे यांनी मोदींच्या राज्यसभेतील भाषणानंतर विजय चौक येथे पत्रकार परिषद घेत टीका केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणारी व्यक्ती वारंवार तुम्ही मोदींवर टीका का करत आहात? अशी विचारणा करत होते.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनापासून ते केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांबद्दल अनेक गोष्टींवर भाष्य केले. देशभरामध्ये सध्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरु असणारी शेतकरी आंदोलने, तसेच दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून सुरु असणारे शेतकरी आंदोलन या पार्श्वभूमीवर मोदींनी विरोधकांकडून होत असणाऱ्या टीकेचाही समाचार आपल्या भाषणात घेतला. यावेळी काँग्रेसलाही मोदींनी नव्या कृषी कायद्यांमधील तरतुदींबद्दल आक्षेप घेणाऱ्या आणि अनेक ठिकाणी आंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्या सुनावले. विशेष म्हणजे मोदींनी यावेळी माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत काँग्रेसला टोला लगावला.

काँग्रेसने कृषी कायद्यासंदर्भातील भूमिका बदलली असून त्यांनी यू-टर्न घेतल्याचे मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले. तसेच आंदोलनामध्ये काँग्रेस सहभागी होत आहे याबद्दल काहीही आक्षेप नसला तरी त्यांनी शेतकऱ्यांनाही मागील अनेक वर्षांपासून असणारी यंत्रणा आता बदलण्याची असल्याचे सांगणेही महत्वाचे होते, असेही मोदींनी आपल्या भाषणात म्हटले.

पंतप्रधान मोदींनी पुढे बोलताना कृषी धोरणांसंदर्भात यू-टर्न घेणाऱ्यांसाठी आपण मनमोहन सिंग यांचं एक जुनं वक्तव्य वाचून दाखवत असल्याचं सांगत मनमोहन सिंग यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ दिला. मनमोहन सिंग यांनी यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्याचा अधिकार नसल्याचे नमूद केले होते. पण हा अधिकार शेतकऱ्यांना मिळायला हवा तसेच मनमोहन सिंग यांनी कृषी बाजारपेठा अधिक खुल्या करण्याची गरज व्यक्त केली होती. कृषी बाजारपेठांना परावलंबी बनवणारी व्यवस्था बदलण्याचा आमचा उद्देश असल्याचेही मनमोहन सिंग यांनी म्हटल्याचा दाखला मोदींनी दिला. १९३० पासून असणाऱ्या कृषी मालविक्रीसंदर्भातील यंत्रणा नव्याने उभारण्याची गरज असल्याचे सांगताना मनमोहन सिंग यांनी म्हटल्याचेही मोदींनी सांगितले.

मोदींनी यावरुनच पुढे, माझे काँग्रेस ऐकणार नाही किमान मनमोहन सिंग यांचे तर ऐकेल, असे म्हणत टोला लगावला. कृषी क्षेत्रात बदल करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आहो उलट तुम्हाला (काँग्रेसला) अभिमान वाटला पाहिजे की जे मनमोहन सिंग बोलले होते ते मोदीला करावे लागत असल्याचे तुम्ही म्हटले पाहिजे, असे म्हणत मोदींनी काँग्रेसला सुनावले. भाजप खासदारांनी मोदींच्या या वक्तव्यानंतर टेबल वाजवून मोदींच्या या वक्तव्याचे समर्थन केले.

नवीन कृषी कायद्यांमधील मूळ मुद्द्याबद्दल कोणी बोलत नसल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. जो मूळ गाभा कृषी कायद्याचा आहे, त्याबद्दल कोणी बोलत नसून घाई घाईत कायदा संमत करण्यात आला वगैरे विषयांवर बोलले जात आहे. अहो, एवढे मोठे आपलं कुटुंब आहे तर थोडा गोंधळ होणारच. लग्नाच्या कार्यात नाही का एखादा पाहुणा पाहुणचार मिळाला नाही म्हणून नाराज होतो, तसाच प्रकार आहे. एवढे मोठे आपले कुटुंब आहे तर थोडफार असे होणार, असे म्हणत मोदींनी या कायद्याच्या मूळ मुद्द्यांवर चर्चा करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

The post मोदींवर टीका करणाऱ्या काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गेंना धमकी appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3q1YZZb
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!