महाराष्ट्र

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शाळा’ घेणार ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले

Share Now


मुंबई : राज्यात आता सर्व जिल्ह्यांमध्ये ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांना डिसले यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी तसेच सर्वांना शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय व्हावा यासाठी डिसले राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षणामध्ये त्यांच्या माध्यमातून आमुलाग्र बदल होण्यास मदत होईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांची तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण प्रयोग व असामान्य कार्य यामुळे जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून निवड झाली असून ग्लोबल टिचर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. ते असा पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शिक्षक आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्या वेगळ्या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून डिसले हे जगभरातील १४३ हून अधिक देशातील १४०० पेक्षा जास्त शाळांतील मुलांना शिकविण्याचे काम करीत आहेत. डिसले यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी शिक्षण देण्यासाठी १६ हजारपेक्षा अधिक शिक्षकांना मार्गदर्शन केले असून राज्यातील शिक्षकांना त्याचा फायदा होत आहे.

नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम डिसले यांनी सुरु केले आहेत. डिसले यांच्या कामाची ओळख राज्यातील इतर शिक्षकांनाही व्हावी, तसेच ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी सुरु करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यातील शिक्षकांना या कार्यशाळांच्या माध्यमातून नवा आत्मविश्वास मिळून ते अधिक जोमाने काम करतील, त्याचप्रमाणे सरकारी शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

या उपक्रमामधून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी आपल्या जिल्ह्याचा कार्यक्रम निश्चित करावा, अशा सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. डिसले यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी शिक्षण देण्याबाबत मार्गदर्शन करावे, तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन राज्यातील सर्व शाळांनी शिक्षणविषयक नवनवीन उपक्रम राबवावेत, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.

The post राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शाळा’ घेणार ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/2NgZ4d3
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!