महाराष्ट्र

उद्यापासून सर्वसामान्यांसाठी खुली होणार मुंबईतील प्रसिद्ध राणीबाग

Share Now


मुंबई : राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय उद्यापासून पुन्हा खुले होणार असून शक्ती आणि करिश्मा वाघ यावेळी राणीबागेतील खास आकर्षण असणार आहेत. उद्यापासून राणीबागेत अस्वल, तरस, कोल्हे, बिबट्या यांचेही दर्शन मिळणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पण, पर्यटकांना यासाठी नियमावली पाळावी लागणार आहे.

12 फेब्रुवारी, 2020 रोजी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डन व प्राणिसंग्रहालयातून पट्टेरी वाघांच्‍या एका जोडीचे आगमन झाले आहे. दाखल झालेल्‍या या वाघांच्‍या जोडीमध्‍ये 6 वर्षे वय असलेल्‍या एका वाघि‍णीचा समावेश असून तिचे नाव ‘करिश्मा’ असे आहे. तसेच या जोडीमध्‍ये असणाऱ्या वाघाचे नाव ‘शक्ती’ असे असून त्‍याचे वय 4 वर्षे आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातून या जोडीच्‍या बदल्यात दोन जोडी ‘चितळ’ आणि दोन जोड्या ‘चित्रबलाक’ (रंगीत करकोचा) सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला देण्यात आले आहेत.

राणीबागेत जाण्यापूर्वी नियमावली पुर्णपणे वाचा

 1. कोरोना विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
 2. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, 5 वर्षांखालील मुले यांनी शक्यतो राणीबागेला भेट देणे टाळावे अशी सूचना पालिकेने केली आहे.
 3. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात प्रवेश करताना मास्कचा वापर अनिवार्य असेल.
 4. वाहनधारकांनी प्रवेशद्वाराजवळ वाहनांची चाके निर्जंतुकीकरण फवारणी करूनच प्राणिसंग्रहालयात प्रवेश करावा.
 5. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तिकीट खिडकीजवळ आखून दिलेल्या जागेवरच रांगेत उभे राहावे. गर्दी करू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
 6. प्राणिसंग्रहालयात येताना सोबत कमीत कमी वस्तू/साहित्य आणावे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वस्तू/साहित्य जमा करून ठेवण्याची सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
 7. हात निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) प्रवेशद्वाराजवळ करूनच उद्यानात प्रवेश करावा.
 8. प्राणिसंग्रहालयात प्रवेश केल्यावर गर्दीने/समूहाने फिरू नये.
 9. प्रदर्शनीय क्षेत्रात प्राणी पाहण्यासाठी गर्दी करू नये.
 10. कोरोना विषाणू प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रदर्शनीय क्षेत्रात काचेला अथवा बॅरिकेडला स्पर्श करू नये.
 11. प्राणिसंग्रहालयात केरकचरा इतरत्र टाकू नये. कचराकुंडीचा वापर करावा. कोठेही थुंकू नये.
 12. एकवेळ वापराचे (सिंगल यूज) मास्क व हातमोजे इतरत्र न फेकता जागोजागी ठेवण्यात आलेल्या विशिष्ट कचऱ्याच्या डब्यात टाकावे.

The post उद्यापासून सर्वसामान्यांसाठी खुली होणार मुंबईतील प्रसिद्ध राणीबाग appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3deqriW
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!