महाराष्ट्र

महापारेषणला डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरासाठी सुवर्ण पारितोषिक

Share Now


मुंबई : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या 71व्या ऑनलाईन शिखर संमेलनात स्कॉच पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘कार्पोरेट एक्सलन्स’ अंतर्गत ‘डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर’ यासाठी महापारेषणला सुवर्ण पारितोषिकाची घोषणा झाली. महापारेषण कंपनीने जॅाईंट व्हेंचर उपक्रमाद्वारे अतिउच्च दाब वाहिन्यांच्या मनोऱ्यावर ओपीजीडब्ल्यू (ऑप्टिकल ग्राउंड वायर) नेटवर्क प्रस्थापित केले आहे.

या पारितोषिकाबद्दल ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. स्कॉच ग्रुपच्यावतीने दरवर्षी शासन, अर्थ, बॅंकिंग, तंत्रज्ञान, सांघिक नागरिकत्व, आर्थिक या क्षेत्रातील वाढीसाठी हा पुरस्कार दिला जातो. महापारेषणच्यावतीने नामांकन भरून पुरस्कार गुणांकन पद्धतीने मिळवला आहे.

ओपीजीडब्ल्यू हे अर्थिंग व दूरसंचरण अशा हे कार्यात उपयोगाला येते. महापारेषणने सद्यस्थितीत असलेल्या साधनांचा योग्य उपयोग करून उत्पन्नाचा नवीन स्त्रोत साध्य करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबविला आहे. सद्यस्थितीत ओपीजीडब्ल्यूचे जाळे 3 हजार कि. मी. लांबीचे महाराष्ट्रातील 9 मुख्य शहरे, 185 शहरे/गावांना व २५ जिल्ह्यातील ९९४ ग्रामपंचायतीना जोडणारे आहे. या ओपीजीडब्ल्यूमधील 8 फायबरचा उपयोग महापारेषणला लागणाऱ्या विद्युत वाहिनी व उपकरणांच्या संरक्षणाकरिता व अंतर्गत दूरसंचारणाकरिता होत आहे. उर्वरित 40 फायबर हे भाडेतत्वावर दूरसंचारणकरिता नेटवर्क ऑपरेटर्सना दिले जाते. त्याद्वारे महापारेषणला उत्पन्नाचे अतिरिक्त साधन उपलब्ध होते. आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व शहरे/गावांना ओपीजीडब्ल्यूद्वारे जोडण्याचा महापारेषण कंपनीचा संकल्प आहे. अतिरिक्त आर्थिक स्त्रोतामुळे पारेषण दरामध्ये कपात शक्य होणार आहे.

महापारेषणने या यशाचे श्रेय ऊर्जामंत्री डॉ.राऊत व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वाघमारे यांना दिले आहेत. महापारेषणचे अभिनंदन करताना ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले, महापारेषणचा ओपीजीडब्ल्यू प्रकल्प हा देशातील राज्य पारेषण उपक्रमाने राबविलेला सर्वात मोठा प्रकल्प असून त्याद्वारे अंतर्गत दूरसंचारणाची गरज भागवून अतिरिक्त फायबर भाडेतत्वावर दिल्यामुळे डिजिटल क्रांतीचा मार्ग सुकर होणार आहे. जादा महसुलाद्वारे पारेषण भाड्यामध्ये कपातीस मदत होणार आहे. महापारेषणच्या मनोऱ्यांवर मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्सची दूरसंचार उपकरणेही बसविली आहेत. उपलब्ध साधन संपत्तीच्या सुयोग्य वापरामुळे हे शक्य झाले आहे.

भूमिगत जाळ्यांपेक्षा महापारेषणच्या अतिउच्च दाब वाहिन्यांच्या मनोऱ्यांवरील ओपीजीडब्ल्यू जाळ्यांचे अनेक फायदे असून त्यामुळे देशातील प्रमुख नेटवर्क ऑपरेटर्स उच्च नेटवर्क उपलब्धतेमुळे याचा प्राधान्याने उपयोग करतात. महापारेषणचे ओपीजीडब्ल्यू नेटवर्क केवळ मुंबई , पुणे यासारख्या महानगरांत नसून ग्रामीण व दुर्गम भागांतही उपलब्ध आहे. याद्वारे उत्पादनक्षमता व राज्याच्या आर्थिक वाढीस मोठा हातभार लागणार आहे, असेही डॉ. राऊत म्हणाले.

उपक्रमाचे फायदे म्हणजेच सद्यस्थितीत असलेल्या साधनांचा योग्य उपयोग, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत, योग्यरित्या महापारेषणच्या उपक्रमाचे संरक्षण व दूरसंचारणास मदत आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. भूमिगत ऑप्टिकल फायबर केबलपेक्षा मनोऱ्यावरील ओपीजीडब्ल्यू ही जास्त सुरक्षित, विश्वसनीय व अधिक उपलब्धतता असल्याने हा प्रकल्प विशेष लक्षणीय आहे. परीक्षकांनी या उपक्रमाबद्दल महापारेषणचे कौतुक केले.

The post महापारेषणला डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरासाठी सुवर्ण पारितोषिक appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3smYjON
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!