महाराष्ट्र

तळपायांची सतत आग होते का? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Share Now

legs
अंगात ताप असेल, किंवा शरीरातील उष्णता वाढली असेल, तर क्वचित तळपायांची आग होऊ शकते. अशा वेळी काही साधे घरगुती उपाय केल्याने ही समस्या दूर होऊ शकते. काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र ही समस्या सातत्याने उद्भविणारी आणि गंभीर असते. अशा वेळी ही समस्या उद्भविण्यामागे नेमके काय कारण असू शकेल याचे निदान करण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करून घेऊन त्यानुसार आवश्यक ते उपचार करणे अगत्याचे ठरते. क्वचित यामागचे कारण शरीरातील नर्व्हस सिस्टम शिथिल झालेली असणे, किंवा तिला झालेले कोणत्याही प्रकारचे नुकसान, हे असू शकते.
legs1
नर्व्हस सिस्टम शरीरातील सर्व नसा आणि वाहिन्यांच्या कार्यासाठी जबाबदार असून, जर यामध्ये काही बिघाड झाला, तर त्याचा थेट परिणाम सर्वच अवयवांवर आणि शरीराच्या कार्यप्रणालीवर पडत असतो. त्यामुळे नर्व्हस सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास सतत पाय दुखणे, तळपायांची आग होणे, तळपायांमध्ये काहीतरी टोचत असल्याप्रमाणे वेदना होणे इत्यादी समस्या उद्भवतात. नर्व्हस सिस्टम सोबत शरीराच्या इतरही अनेक कार्यांसाठी बी १२ हे जीवनसत्व अतिशय महत्वाचे असते. याची कमतरता शरीरामध्ये असल्याने ही तळपायांची आग होणे, पायांना सतत मुंग्या येणे अशा समस्या जाणवू शकतात.

तळपायांची सतत आग होण्यामागे उच्च रक्तदाब हे ही कारण असू शकते. उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते. त्याचबरोबर लिव्हरशी निगडीत समस्या असतील तरीही तळपायांची आग होऊ शकते. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास, रक्त वाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास, तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा कर्करोगासाठी औषधोपचार घेत असतील त्यांच्या बाबतीतही सातत्याने तळपायांची आग होण्याची समस्या आढळून येत असते.
legs2
तळपायांची आग होण्याची समस्या सातत्याने उद्भवत असलयास वैद्यकीय तपसणी करून घेणे अगत्याचे ठरते. या समस्येमागील कारणाचे निश्चित निदान करण्यासाठी इलेक्ट्रोमायोग्राफी, रक्ताची व लघवीची तपासणी, रक्ततपासणीच्या माध्यामातून जीवनसत्वांच्या स्तराची तपासणी, नर्व्ह बायोप्सी, इत्यादी तपासण्या उपलब्ध असून, वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य त्या तपासण्या करून घ्याव्या. तळपायांची आग कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपचारांचा अवलंब करता येईल. गाईच्या दुधापासून बनविल्या गेलेल्या तुपाने तळपायांची मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते. तसेच सैंधवामध्ये असलेल्या मॅग्नेशियम सल्फेटमुळेही गुण येतो. हा उपाय करण्यासाठी एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव घालावे. या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते, तसेच पायांवर सूज असल्यास ती ही कमी होते. मात्र हा उपाय उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये.

दोन चमचे मोहोरीचे तेल घेऊन त्यामध्ये दोन चमचे थंड पाणी किंवा एक बर्फाचा तुकडा मिसळावा. या मिश्रणाने तळपायांची मालिश केल्याने त्वरित गुण येतो. त्याचप्रमाणे दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मिसळून याचे नियमित सेवन केल्यानेही तळपायांची आग होणे कमी होते.

The post तळपायांची सतत आग होते का? जाणून घ्या कारणे आणि उपाय appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/2OwRThN
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!