महाराष्ट्र

आजमावून पहा ‘व्हाईट टी’चे फायदे

Share Now

White-Tea

दिवसभराच्या धावपळीनंतर काही काळ विश्रांती आणि गरमागरम चहा मिळाला, की शरीराची मरगळ दूर होऊन शरीर कसे ताजेतवाने होते. चहा कडक, मसालेदार असो, की फिटनेसच्या बाबतीत जागरूक असलेल्यांचा आवडता ग्रीन टी असो, चहामुळे शरीरामध्ये उत्साह संचारतो एवढे मात्र नक्की. सामान्यपणे सेवन केल्या जाणाऱ्या अनेक तऱ्हेच्या चहांच्या व्हरायटीमध्ये सध्या ‘व्हाईट टी’ झपाट्याने लोकप्रिय होत आहे. ‘कॅमिलीया सिनेन्सीस’ झाडा पासून तयार करण्यात येणारा हा व्हाईट टी उत्कृष्ट चवीचा तर आहेच, पण त्याशिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय लाभदायक आहे. कॅमिलीया सिनेन्सीस झाडाला येणारी पाने आणि कळ्या संपूर्णपणे उमलण्याआधीच त्या खुडून घेतल्यानंतर त्यावर दिसत असलेल्या शुभ्र तंतुंच्यामुळे या चहाला व्हाईट टी म्हटले जाते.

White-Tea1
चहाच्या इतर प्रकारांच्या मानाने व्हाईट टी हा सर्वात कमी प्रोसेसिंग केला जाणारा चहा आहे. त्यामुळे या चहामध्ये अँटी ऑक्सिडंट्सची मात्रा अधिक असून त्यासाठी हा चहा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम मानला गेला आहे. काही काळापूर्वी केवळ आशिया खंडामध्येच प्रसिद्ध असणारा हा चहा, आरोग्यासाठी याच्या सेवनाने होणाऱ्या फायद्यांमुळे आता पाश्चात्य देशांमध्येही झपाट्याने लोकप्रिय होऊ लागला आहे. या चहाच्या एका कपामध्ये फॅटचे प्रमाण अजिबात नसून, यामध्ये कॅफिनचे प्रमाण दर शंभर ग्राममागे १५-२० मिलीग्राम इतके आहे.

White-Tea2
या चहाच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. या चहामध्ये पॉलिफेनॉल्स आणि अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असून, त्यामुळे शरीराच्या कोशिकांना होणारी हानी थांबविता येते. तसेच वारंवार होणाऱ्या कोणत्याही संसर्गापासून शरीराचा बचाव करणारी प्रतिकारशक्ती वाढविण्यास या चहाचे सेवन सहायक आहे. हृदयाशी निगडित समस्या टाळण्यासाठीही या चहाचे सेवन उत्तम मानले गेले आहे. त्याचबरोबर अतिरिक्त वजन घटविण्यासाठी देखील हा चहा उपयुक्त आहे. याच्या सेवनाने शरीरातील चरबी घटण्यास मदत होते. या चहाच्या सेवनाने शरीराची चयापचय शक्तीही वाढत असल्याने वजन घटण्यास मदत होते.

या चहामध्ये टॅनिन आणि फ़्ल्युओराईड्स असल्याने दात व हिरड्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही या चहाचे सेवन लाभदायक आहे. या चहाच्या सेवनाने तोंडातील हानिकारक जीवाणूंचा नाश होतो. त्यामुळे दातांना कीड लागणे, श्वासाची दुर्गंधी टाळण्यासाठी या चहाचे सेवन अवश्य केले जावे. या चहामध्ये कर्करोग प्रतिकारक तत्वे असून, फुफ्फुसांच्या कर्करोगासाठी या चहाचे सेवन विशेष फायद्याचे मानले जाते. या चहाच्या सेवनाने इंस्युलीन सक्रीय होत असल्याने ‘इंस्युलीन रेझिस्टन्स’शी निगडित समस्यांमध्येही या चहाचे सेवन लाभदायक मानले गेले आहे. तसेच हाडांच्या बळकटीसाठी व सुंदर त्वचेसाठी देखील हा चहा विशेष फायद्याचा आहे.

The post आजमावून पहा ‘व्हाईट टी’चे फायदे appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3eB8DyR
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!