महाराष्ट्र

जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती; गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा झेंडा

Share Now


जळगाव – जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती पहायला मिळाली असून गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या महापालिकेतील सत्तेला सुरूंग लावण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. भाजपने जळगाव महापालिकेमधील सत्ता २७ नगरसेवक फुटल्यामुळे गमावली आहे. शिवसेनेलाच ‘एमआयएम’च्या तीन नगरसेवकांनीही मतदान केल्यामुळे जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी महापौर-उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव करत महापौरपद मिळवले आहे. प्रतिभा कापसे यांचा जयश्री महाजन यांनी १५ मतांनी पराभव करत महापौरपदी आपले नाव निश्‍चित केले. जयश्री महाजन यांना ४५ मतं मिळाली, तर प्रतिभा कापसे यांना ३० मते मिळाली. भाजपेचे २७ नगरसेवक फुटल्याने आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मते मिळवली. कुलभूषण पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.

भाजपने महापालिका निवडणुकीत फोडाफोडीच्या राजकारणाने आपला खुंटा मजबूत केला होता. सेनेने तोच कित्ता गिरवला. जळगाव म्हणजे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला. घरच्या धावपट्टीवर त्यांना चितपट करण्यासाठी सेनेचे खासदार विनायक राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला होता. गुलाबराव पाटील भाजपच्या फुटीर नगरसेवकांसह ठाण्यातील हॉटेलमध्ये थांबले होते.

नगरसेवक महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या तोंडावर फुटल्याने संकटमोचक गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली होती. एकूण ७५ सदस्य असणाऱ्या महापालिकेत भाजपचे ५७, शिवसेनेचे १५, एमआयएमचे तीन असे संख्याबळ होते. पण जवळपास निम्मे नगरसेवक विरोधकांना जाऊन मिळाल्याने भाजपच्या सत्तेला अडीच वर्षात ग्रहण लागले आहे.

The post जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती; गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा झेंडा appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3r7wUiZ
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!