महाराष्ट्र

भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; ठाकरे सरकारच्या दबावात महाराष्ट्र पोलिसांना नको ती कामे करावी लागत आहेत

Share Now


मुंबई – सचिन वाझे प्रकरणी चर्चेत आणि पर्यायाने वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली असून गृहरक्षक दलामध्ये परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. हेमंत नगराळे यांची त्यांच्या जागेवर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरणात परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर काल(बुधवार) राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले. याचबरोबर भाजपने आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या देखील राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. भाजपने या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका करणे सुरू केले आहे.


जगभर नावाजलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर इतका दबाव कधीही आला नसेल. हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात त्यांना नको ती कामं करावी लागताहेत. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचं आणि अनेक प्रकरणं दाबण्याचं पाप या सरकारकडून केलं जातंय!, असे ट्विट भाजपकडून करण्यात आले आहे.

तसेच, भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. वाझेंची नेमणूक चालवून घेतली, आता त्यांना सॅल्यूटही ठोका हा आदेश मानणार नाही सांगितल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली का? हिरेन यांच्याबाबत बातम्या आल्यानंतरही वाझेंवर काहीच कारवाई झाली नाही. एनआयए चौकशी सुरू होईपर्यंत वाझेंना सांभाळून घेण्याचे आदेशच होते का? एवढे भयंकर कट रचणाऱ्याच्यांच हाती तपास याचा अर्थ चोराच्या हातीच चाव्या देण्याएवढे मजबूर का झालात गृहमंत्री? पोस्टमार्टेमचा रिपोर्ट, वाझेंचा कथित सहभाग, हिरेन यांच्या पत्नीचे आरोप या सगळ्यानंतर वाझेंच्या मुसक्या आवळणे गरजेचे होते. पण तसे का झाले नाही? ज्या अदृश्य शक्तींनी वाझेंना संरक्षण दिले होते, त्यांच्याच इशाऱ्यावर एटीएस काम करत आहे. तुमच्याकडे गृहखाते खरोखरच आहे की तुम्ही फक्त नामधारी? उत्तर द्याल अनिल देशमुख? असे प्रश्न भाजपकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारण्यात आले आहेत.

The post भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; ठाकरे सरकारच्या दबावात महाराष्ट्र पोलिसांना नको ती कामे करावी लागत आहेत appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/38OIl8P
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!