महाराष्ट्र

नेमके काय घडले त्या रात्री ?; एनआयएकडून नाट्य रुपांतर करत संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न

Share Now


मुंबई – सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी सुरु आहे. शुक्रवारी रात्री अंबानींचे निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर तपासाचा भाग म्हणून सचिन वाझे यांना आणण्यात आले होते. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी एनआयएकडून नाट्य रुपांतर करत संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला स्कॉर्पिओ गाडी बेवारस अवस्थेत आढळली. पुढे त्यात अडीच किलो जिलेटीन आणि अंबानी कुटुंबाला धमकावणारी चिठ्ठी आढळली. या परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाचे विश्लेषण केले असता ही स्कॉर्पिओ वाझे यांनी चालवत आणली आणि अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमायकल रोडवर उभी केली, असा संशय ‘एनआयए’ला आहे. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर एनआयएने हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून आपल्याकडे घेतले असून तपास सुरु आहे.

सचिन वाझे यांना स्कॉर्पिओ सापडली तिथपर्यंत एनआयएने चालायला लावले. आधी सचिन वाझेंना शर्ट आणि पँटमध्ये चालायला सांगण्यात आल्यानंतर त्यांना कुर्ता आणि डोक्याला रुमाल बांधून चालायला लावण्यात आले. सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती आणि सचिन वाझे यांच्यातील साधर्म्या तपासण्याचा प्रयत्न एनआयकडून करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. एनआयएने सचिन वाझे वापरत असलेल्या वाहनात गाडीची नंबरप्लेट सापडल्याचा दावा केला आहे. तसेच अँटिलियाबाहेर त्या रात्री सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचाही दावा आहे.

वाझे एकूण १२ महागड्या गाड्या एनआयए आणि एटीएसच्या तपासात वापरत असल्याचे उघडकीस आले आहे. ही सर्व वाहने ते गुंतवणूकदार किंवा भागीदार असलेल्या तीन कंपन्यांच्या नावे असल्याची माहिती पुढे आली. यापैकी दोन मर्सिडीज, एक लॅण्डक्रुजर प्रॅडो गाडी एनआयएने जप्त केली आहे. अन्य नऊ गाड्यांचा वाझे यांनी गुन्ह्यात वापर केला आहे का, याबाबत चौकशी-तपास सुरू असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

The post नेमके काय घडले त्या रात्री ?; एनआयएकडून नाट्य रुपांतर करत संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3c3VFs0
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!