महाराष्ट्र

आरोग्यदायी भोजनासाठी लक्षात घ्यावी आयुर्वेदातील तत्वे

Share Now

food
भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाचे अस्तित्व पाच हजार वर्षांच्याही पूर्वीपासूनचे असले, तरी आयुर्वेदाचे ज्ञान आजच्या काळामध्येही तितकेच प्रभावी आणि उपयुक्त आहे. ‘निरोगी आयुष्याचे ज्ञान’ देणारा आयुर्वेद शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळींवर आयुष्य कशाप्रकारे चांगले व्यतीत करता येईल याचा मार्गदर्शक आहे. आजच्या काळामध्ये आयुर्वेदाचे ज्ञान केवळ भारतामधेच नाही, तर परदेशामध्येही असंख्य लोकांसाठी उपयुक्त ठरत आहे. आयुर्वेदामध्ये नित्याच्या जीवनक्रमातील अनेक बाबींवर विस्तारपूर्वक विवरण केले गेले आहे, जेणेकरून यांचा स्वीकार केल्याने आरोग्यप्राप्ती होते. यामध्ये नित्याचे भोजन कशाप्रकाचे असावे याबद्दलही आयुर्वेदामध्ये मार्गदर्शन केले गेले आहे.
food1
आजच्या काळामध्ये भोजन बनविण्याच्या पद्धती, आवडीनिवडी बदलल्या आहेत. अनेक नवीन चवीचे आणि पद्धतीचे पदार्थ आता आपल्या आहारामध्ये समाविष्ट झाले आहेत. पण जेव्हा हे पदार्थ बनविताना या पदार्थाचे पोषण मूल्य लक्षात न घेता केवळ चव चांगली लागते म्हणून पदार्थ वारंवार खाल्ला जातो, तेव्हा तो शरीराला नुकसान करणारा ठरत असल्याचे आयुर्वेद म्हणतो. पूर्वीच्या काळी ताजे अन्न खाण्याला महत्व दिले जात असे. अगदी घरामध्ये नित्याची वापरली जाणारी पीठे, मसाले घरामध्येच दळण्यापासून ते भाज्या, फळे, धान्य शेतावरून थेट घरामध्ये कोणतेही प्रोसेसिंग न होता येत असे. साहजिकच अन्नाचे पोषणमूल्य जास्त असे. आताच्या काळामध्ये जरी हे सर्व शक्य नसले, तरी भोजन बनविताना किंवा खाताना काही गोष्टी आपण नक्कीच लक्षात घेऊ शकतो.
food2
आयुर्वेदामध्ये ऋतुमानानुसार खाण्याला महत्व दिले गेले आहे. म्हणजेच ठराविक ऋतुंमध्ये मुबलक मिळणारी फळे, भाज्या त्या ऋतूमध्ये आहारामध्ये जास्त प्रमाणात समाविष्ट केली जावीत. अशा प्रकारचा आहार शरीराला त्या ऋतूमध्ये आवश्यक असणारे पोषण देणारा आणि हवामान बदलताना शरीराला रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारा असतो. आयुर्वेदामध्ये अन्न तीन प्रकारचे सांगितले गेले आहे. सात्विक, राजसी, आणि तामसी हे ते तीन प्रकार आहेत. सात्विक पदार्थ संतुलित मानले जात असून यामध्ये ताज्या भाज्या, फळे, धान्ये, कडधान्ये, डाळी, दुध आणि तूप, शेंगभाज्या, वनस्पतींपासून काढलेली तेले, मध, आणि मोहोरी, जिरे, दालचिनी, धणे, आले, हळद इत्यादी मसाल्यांचा समावेश आहे. सात्विक आहार पौष्टिक आणि पचण्यास हलका असतो.
food3
अन्नपदार्थ ताजे असले, तरी जर पचण्यास जड असतील तर यांचा समावेश राजसी आहारामध्ये केला जातो. ज्या व्यक्तींना शारीरिक श्रम भरपूर करावे लागतात, त्यांच्यासाठी अशा प्रकारचा आहार योग्य आहे. हे अन्नपदार्थ शरीराला ताकद देणारे असले, तरी यांच्या अतिसेवनाने शरीर आणि बुद्धी शिथिल होऊ शकतात. राजसी आहारामध्ये मसालेदार पदार्थ, चहा, कॉफी, आणि खारे पदार्थ यांचा समावेश आहे. तामसी आहारामध्ये पचण्यास अतिशय कठीण पदार्थांचा समावेश आहे. या पदार्थांच्या सेवनाने शरीर अतिशय शिथिल होते असे आयुर्वेद सांगतो. या तीन अन्न प्रकारांच्या व्यतिरिक्त भोजन हे व्यक्तीच्या प्रकृतीला अनुसरूनही असावे. मानवी शरीरामध्ये असलेली ‘कफ’, ‘वात, आणि ‘पित्त’ या त्रिदोषांवरही आहार अवलंबून असणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये कोणता ‘दोष’ अधिक प्रभावी आहे हे त्या व्यक्तीचे वय, आहारपद्धती, जीवनशैली, त्याच्या आसपासचे वातावरण, हवामान आणि ऋतू यांवर अवलंबून असल्याने या दोषांचे संतुलन साधणारा आहार कोणत्याही व्यक्तीसाठी आरोग्यदायी ठरत असतो.
food4
आयुर्वेदामध्ये आहाराचे प्रकार, आणि त्रिदोषांचे संतुलन साधणाऱ्या आहारसोबतच ‘षड्रस’ युक्त आहारही महत्वाचा मानला गेला आहे. या सहा रसांपैकी प्रत्येक रसाचे स्वतःचे खास गुणधर्म असतात. ज्यांची ‘वात’ प्रवृत्ती आहे, त्यांनी आपल्या आहारामध्ये षड्रसापैकी गोड, आंबट आणि खारट पदार्थांचा, तसेच ताजे आले, जिरे, काळे मिरे, बडीशेप आणि केशर यांचा समावेश करावा. ज्यांची ‘पित्त’ प्रवृत्ती आहे, त्यांनी आहारामध्ये गोड, कटू रस असणाऱ्या अन्नाचा, व दालचिनी, पुदिना, धणे, हळद, बडीशेप, आणि वेलची या मसाल्यांचा समावेश करावा, तर ज्यांची ‘कफ’ प्रवृत्ती असेल, त्यांनी आहारामध्ये तुरट, आणि कटू रसयुक्त पदार्थांच्या बरोबर लवंग, मोड काढलेले मेथी दाणे, मोहरी, हळद, इत्यादींचा समावेश करण्याचा सल्ला आयुर्वेद देतो.

The post आरोग्यदायी भोजनासाठी लक्षात घ्यावी आयुर्वेदातील तत्वे appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3s78Ai9
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!