महाराष्ट्र

गुजरातमधील पत्रांवरही भाजपा नेत्यांनी नाचून दाखवावे – संजय राऊत

Share Now


नवी दिल्ली – राज्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर खळबळ उडाली असून त्याचे पडसाद लोकसभा, राज्यसभेतही उमटले आहेत. सोमवारी लोकसभेत शिवसेना आणि भाजप खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. यावेळी महाराष्ट्र सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजप खासदारांकडून करण्यात आली. या मागणीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून असे पत्र गुजरातमध्ये अधिकाऱ्यांनी लिहिले होते, तेव्हा राजीनामे का घेतले नाही? अशी विचारणा केली आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

परमबीर सिंह न्यायालयात गेले असतील तर चांगली गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेत सदस्य असून त्यांचे वक्तव्य मी वाचत होतो. कोणलाही सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळत नाही, याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयात दबावात काम करते, असे ते म्हणाले होते. परमबीर सिंह यांना जर हाच दबाव वापरुन काही काम करायचे असेल किंवा करुन घ्यायचे असेल तर ते सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. रंजन गोगोई यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवल्यास ईडी, सीबीआय यांच्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचाही वापर केला जात असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

सरकार बरखास्त करण्याची मागणी राज्यसभा, लोकसभेत गोंधळ घालत करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्याच्या पत्रावर एवढा विश्वास ठेवून राजीनामा मागितला जात असेल तर मला विचारायचे आहे की, गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना आयपीएस अधिकारी संजीव भट्ट, प्रदीप शर्मा यांनी वारंवार अशी पत्रे लिहिली होती. तर मग त्या पत्राच्या आधारे गुजरात सरकारचे माजी मुख्यमंत्री किंवा सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार आहात का ? परमबीर सिंह यांच्यापेक्षाही गंभीर संजीव भट्ट यांनी केलेले आरोप होते. संजीव भट्टला तुम्ही जेलमध्ये टाकले. तर मग महाराष्ट्रात वेगळा न्याय आणि गुजरातमध्ये वेगळा न्याय का? ही कोणती राज्यघटना आहे?, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

माझे कायदामंत्र्यांना संजीव भट यांचे पत्र पुन्हा समोर आणावे असे आवाहन आहे आणि लोकसभा आणि राज्यसभेत जे लोक नाचत होते त्यांनी संजीव भट यांचे पत्र समोर आणावे आणि त्यावरही कारवाईची मागणी करावी, असे संजय राऊत म्हणाले आहेत. नवनीत राणा यांनी अरविंद सावंत यांच्यावर केलेल्या आरोपांवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, यांना काही गंभीर आरोप म्हणत नाहीत. त्या महिलेने माझ्यावर सुद्धा असेच आरोप केले होते.

संजय राऊत मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, सरकारचा मी काही प्रमुख नाही. यासंदर्भातील सर्व निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. वृत्तपत्रात काय आले आहे, यावरुन सरकारचे निर्णय होत नाहीत. राज्यसभेत, लोकसभेत आणि महाराष्ट्रात भाजप नेते ज्या एका पत्रावरुन तांडव करत आहेत त्यांनी गुजरातच्या माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी पत्र लिहून ज्या गोष्टी उघड केल्या होत्या त्याच्या आधारे गुजरातचे सरकार बरखास्त का केले नाही ? याचे उत्तर द्यावे आणि जर ते पत्र आज समोर आणले तर थयथयाट करणारे त्या पत्रावर सुद्धा नाचतील का ? त्यांना बँडबाजा पुरवतो…ढोल ताशे हवे असतील तर पुरवण्यासाठी आम्ही तयार आहोत.

The post गुजरातमधील पत्रांवरही भाजपा नेत्यांनी नाचून दाखवावे – संजय राऊत appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3cR70dS
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!