महाराष्ट्र

राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम देवेंद्र फडणवीस करत आहेत : नवाब मलिक

Share Now


मुंबई : शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यांना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती चुकीची असून देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हालचालीबाबत भ्रम निर्माण करणारी माहिती दिली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांची बदली कोणताही मंत्री अथवा मुख्यमंत्री पोलीस वरिष्ठ करु शकत नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

अनिल देशमुख कोरोनाची लागण झाल्याने 5 फेब्रुवारीपासून 15 तारखेपर्यंत नागपूरमध्ये रुग्णालयात दाखल होते. नागपूरमध्ये ते होम क्वॉरंटाईन होते, असे कुणीही सांगितलेले नाही. मुंबईत अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते. ते 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत शासकीय निवासस्थानी आयसोलेशनमध्ये होते. यादरम्यान कुठल्याही सार्वजिनिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला नाही. पोलीसांच्या दैनंदिन कार्यक्रमाची माहिती देऊन देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची दिशाभूल केल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.

पोलीस बदली घोटाळ्याच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना नवाब मलिक यांनी म्हटले की, राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. त्यांना चांगले माहिती असेल पोलीस अधिकाऱ्यांच्या थेट बदल्या कुठलाही मंत्री अथवा गृहमंत्री करु शकत नाही. पोलीस एस्टाब्लिशमेंट बोर्ड कमिटी बदल्यांसाठी असते. आयपीएस अधिकाऱ्यांनाच्या बदल्यांसाठी ही कमिटी प्रस्ताव तयार करते. या बोर्डमधील सदस्यांच्या शिफारशीनंतर हा प्रस्ताव गृहमंत्र्यांच्या कार्यालयात येतो. येथे हे अधिकारी आपले मत नोंदवतात. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात मान्येतसाठी हा प्रस्ताव पाठवल्यानंतर या बदल्यांच्या ऑर्डर्स निघतात. त्यामुळे कोणताही मंत्री अथवा मुख्यमंत्री अधिकाऱ्यांची थेट बदली करु शकत नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस पोलीस बदलीची नियमावली माहित असताना चुकीची माहिती देत आहेत. फडणवीस महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा कट करत आहेत. कोणतीही परवानगी न घेता रश्मी शुक्ला फोन टॅप करत होत्या. रश्मी शुक्ला राज्यात सरकार स्थापनेच्या काळातही अनेक नेत्यांचे फोन टॅप करत होत्या. भाजपच्या एंजट या नात्याने रश्मी शुक्ला या काम करत होत्या. पोलीस ज्या अहवालाचा दाखला अधिकार बदली घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीस देत आहेत त्यातील 80 टक्के बदल्या त्या पद्धतीने झाल्याच नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.

सत्ता गेल्यानंतर हे सरकार जाईल यासाठी भाजपचे नेते तारखा देत होते. सरकार यांना पाडता आले नाही, त्यामुळे सरकारला बदनाम करण्याचे काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहसचिवा़कडे जाणार आहेत. याचा अर्थ त्यांना सरकार पाडता येत नसल्यामुळे अधिकार्‍यांना हाताशी धरून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.

The post राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम देवेंद्र फडणवीस करत आहेत : नवाब मलिक appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3c9UGqb
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!