महाराष्ट्र

भारताचे इंग्लंडसमोर विजयासाठी 318 धावांचे लक्ष्य

Share Now


पुणे – भारताने कसोटी आणि टी-20 मालिकेत दमदार प्रदर्शन केल्यानंतर आजपासून इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मोहिमेला सुरुवात केली आहे. आज उभय संघात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना सुरु आहे. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकण्याची परंपरा कायम ठेवली असून कर्णधार ईऑन मॉर्गनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडकडून फलंदाजीचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन या अनुभवी जोडीने भारतासाठी सलामी दिली. संयमी सुरुवात या दोघांनी केली. सुरुवातीला दबावात खेळणाऱ्या रोहितने आठव्या षटकात आक्रमक फलंदाजीचा पवित्रा धारण केला. भारताने दहा षटकात बिनबाद 39 धावा फलकावर लावल्यानंतर तेराव्या षटकात या दोघांनी भारताचे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा बटलरकरवी झेलबाद झाला. रोहितने 42 चेंडूत 4 चौकारांसह 28 धावांची संथ खेळी केली. यानंतर आलेल्या विराट कोहलीसोबत शिखर धवनने संघाची धावसंख्या पुढे नेली.

या दोघांनी सामन्याच्या 24व्या षटकात भारताला शंभरीपार नेले. तर, धवनने याच षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने 25 षटकात 1 बाद 117 धावा अशी मजल मारली. धवनच्या अर्धशतकानंतर विराटनेही झटपट अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकी खेळीनंतर मार्क वूडने विराटला बाद केले. विराटने 6 चौकारांसह 56 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यर 6 धावांची भर घालून वूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

धवनला शतकाने सामन्याच्या 39व्या शतकात हुलकावणी दिली. स्टोक्सला फटका खेळताना धवन 98 धावांवर मॉर्गनकरवी झेलबाद झाला. आपल्या खेळीत त्याने 11 चौकार आणि 2 षटकार ठोकले. धवननंतर आलेल्या हार्दिक पंड्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो एक धाव काढून बाद झाला. हार्दिक स्टोक्सचा तिसरा बळी ठरला. आघाडीच्या फलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर भारताची मधली फळी ढेपाळली.

त्यानंतर आज एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलेला कृणाल पंड्या संघासाठी धावून आला. धावांसाठी झगडत असलेल्या राहुलला त्याने हाताशी घेत आक्रमक फलंदाजी केली. पदार्पणाच्या सामन्यात कृणालने दमदार अर्धशतक ठोकले. कृणालनंतर राहुलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज म्हणून कृणाल पंड्याच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे. कृणालने 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

The post भारताचे इंग्लंडसमोर विजयासाठी 318 धावांचे लक्ष्य appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3r9dgDb
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!