महाराष्ट्र

दिवसभरात राज्यातील १३२ कोरोनाबाधितांचा मृत्यू; तर २८ हजार ६९९ नवे कोरोनाबाधित!

Share Now


मुंबई – राज्य सरकार आणि प्रशासन कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा कसा घालायचा? या प्रश्नावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात तब्बल १३२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब सरकारी आकडेवारीवरून समोर आली आहे. त्यामुळे कोरोना पुन्हा एकदा राज्यात उग्र रुप धारण करतो की काय, अशी भिती आता आरोग्य यंत्रणांना वाटू लागली आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्क्यांपर्यंत वर गेला आहे. तर रिकव्हरी रेट तब्ल ८८.७३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

नुकतीच कोरोनासंदर्भात नवी नियमावली राज्य सरकारने जारी केली असून त्यानुसार चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, कार्यालये या ठिकाणी ५० टक्के क्षमतेने प्रेक्षक किंवा कर्मचाऱ्यांना परवानगी असेल, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक वेळा नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील केले आहे. नियम पाळले नाहीत, तर नाईलाजाने अंतिम उपाय म्हणून लॉकडाऊनचा पर्याय असेल, असा इशारा देखील सरकारकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वाढती कोरोनाबाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा पुन्हा एकदा राज्याला लॉकडाऊनच्या दिशेने घेऊन जाण्याची शक्यता आहे.

मंगळवारच्या आकडेवारीनुसार, राज्यात दिवसभरात एकूण १३ हजार १६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, दुसरीकडे एकूण २८ हजार ६९९ नव्या कोरोनाबाधितांची भर देखील पडल्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता २५ लाख ३३ हजार ०२६ इतका झाला आहे. त्यापैकी २ लाख ३० हजार ६४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे राज्यात आजपर्यंत ५३ हजार ५८९ मृत्यू झाले आहेत.

मुंबईतील ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी दिवसभरात तब्बल ३ हजार ५१२ नवे कोरोनाबाधित सापडले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १२०३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून रिकव्हरी रेट आता ९० टक्क्यापर्यंत आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने देखील यंदा होळी आणि धुलिवंदन हे उत्सव खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यावर बंदी घातली आहे.

The post दिवसभरात राज्यातील १३२ कोरोनाबाधितांचा मृत्यू; तर २८ हजार ६९९ नवे कोरोनाबाधित! appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3cf0KxO
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!