महाराष्ट्र

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 66 धावांनी दणदणीत विजय

Share Now


पुणे – टीम इंडियाने पुण्यात आज (मंगळवारी) इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला प्रारंभ केला. आज उभय संघात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना खेळवण्यात आला. भारताने यात इंग्लंडला 66 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 50 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 317 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 251 धावांवर गारद झाला. डावाच्या सुरुवातीला महागड्या ठरलेल्या प्रसिध कृष्णाने उत्तरार्धात दमदार कमबॅक करत इंग्लंडला हादरे दिले.

इंग्लंडने भारताच्या 318 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी इंग्लंडच्या डावाची सुरुवात केली. बेअरस्टोने आक्रमक तर, रॉयने सावध पवित्रा धारण करत संघाचे 7व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. भारताचा पदार्पणवीर गोलंदाज प्रसिध कृष्णाला पहिल्या 3 षटकात 37 धावा चोपल्या गेल्यानंतर बेअरस्टो-रॉय जोडीने भारताच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. दरम्यान बेअरस्टोने अर्धशतक झळकावले. 14व्या षटकापर्यंत इंग्लंडने बिनबाद 135 धावा कुटल्या. त्यानंतर कृष्णाने रॉयला माघारी धाडत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला बळी नोंदवला. रॉयने 7 चौकार आणि एका षटकारासह 46 धावा केल्या. रॉयनंतर आलेला बेन स्टोक्सही आपली छाप पाडू शकला नाही.
कृष्णाने त्याला झेलबाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर विराटने मॉर्गनचा झेल सोडला. सलामीच्या पडझडीनंतर मॉर्गन-बेअरस्टो जोडीने दबाव झटकण्याचा प्रयत्न केला. पण, बेअरस्टोने मोठा फटका खेळण्याच्या नादात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर सोपा झेल दिला. बेअरस्टोने 66 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांसह 94 धावांची खेळी केली.

इंग्लंडच्या डावाला बेअरस्टोनंतर उतरती कळा लागली. यानंतर भारताच्या गोलंदाजांनीही दमदार कमबॅक करत इंग्लंडला अडचणीत टाकले. शार्दुलने इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनला खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. मॉर्गन यष्टीरक्षक राहुलकडे झेल देऊन बाद झाला. त्याने 22 धावा केल्या.

जोस बटलरला तिखट मारा करणाऱ्या शार्दुलने पायचित पकडत इंग्लंडला संकटात टाकले. त्यानंतर मोईन अली आणि सॅम बिलिंग्ज जोडीने संघर्ष केला. पण बिलिंग्जला कृष्णाने बाद करत ही जोडी फोडली. बिलिंग्जने 18 धावा केल्या. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने मैदानावर स्थिरावलेल्या मोईन अलीला वैयक्तिक 30 धावांवर बाद केल्यानंतर कृणालने सॅम करनला बाद करत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील पहिला बळी घेतला. सॅम करननंतर इंग्लंडचे शेपटाकडचे फलंदाज पराभव टाळण्यात अपयशी ठरले. भारताकडून प्रसिध कृष्णाने 54 धावांत 4 बळी घेत दमदार पदार्पण केले. शार्दुल ठाकूरने 3, भुवनेश्वरने 2 तर कृणालने एक बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

The post पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 66 धावांनी दणदणीत विजय appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3reukaP
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!