महाराष्ट्र

फोन टॅपिंग प्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

Share Now


मुंबई – आज फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यपालांनी फोन टॅपिंग प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्याला वाचवणे गरजेचे असल्यामुळेच या प्रकरणामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावे, अशी विनंती आम्ही केल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये मुनगंटीवार यांनी दिली. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसवर हल्लाबोल करत काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष असल्याचा टोला लगावला. तसेच त्यांनी काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावे, असेही म्हटले आहे.

राज्यामध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये घडणाऱ्या घटना या चिंताजनक असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे मौन ही सर्वात चिंताजनक गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांचे मौन हे घातक आहे. दोन पत्रकार परिषदा घेऊन शरद पवार यांनी हा प्रकार पाठीमागे घालण्याचा प्रयत्न केल्याचेही फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे, काँग्रेस अस्तित्वातच नसल्यासारखे चित्र आहे. दिल्लीतील नेते वेगळे बोलत आहेत. येथील नेते वेगळे बोलत आहेत. हे सगळे केवळ सत्तेसाठी एकत्र आहेत बाकी काही नसल्याचा टोला फडणवीसांनी काँग्रेसला लगावला. फडणवीस यांनी पुढे बोलताना काँग्रेसला सवाल विचारताना, काँग्रेसला किती हिस्सा किंवा वाटा आहे, असे म्हटले आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलते केले पाहिजे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे सरकारने या बदली रॅकेटवर काय कारवाई केली, याचा अहवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून मागवावा ही आमची मागणी असल्याचे भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे. आम्ही राज्यपालांच्या निर्दर्शनास १०० हून अधिक मुद्दे आणून दिल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

The post फोन टॅपिंग प्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3f6ecG1
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!