महाराष्ट्र

यामुळे मुख्यमंत्र्यांनी फोन टॅपिंग प्रकरणी बाळगले आहे मौन – संजय राऊत

Share Now


नवी दिल्ली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सरकार वाचविण्यासाठी पोलीस पदोन्नत्या व बदल्यांमधील भ्रष्टाचारावर पांघरुण घातले गेल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. केंद्रीय गृहसचिवांकडे पुरावे सादर करून देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. संबंधितांचे दूरध्वनी गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांनी टॅप करून पुरावे गोळा केले आणि २५ ऑगस्ट २०२० मध्ये सरकारला महासंचालकांमार्फत अहवाल देऊनही मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नसल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांकडून एवढे गंभीर आरोप होत असतानाही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान याचे उत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

दिल्लीत पत्रकारांशी संजय राऊत यांनी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री या प्रकरणावर कोणतंही भाष्य करत नसल्याचे त्यांना विचारण्यात आले आहे. त्यावर ते म्हणाले की, तानाजी मालुसरे, बाजीप्रभूंचे आम्ही सगळे वंशज आहोत. आमचे जे प्रमुख आहेत, त्यांच्यासाठी लढणे आमचे काम आहे. ते मुख्यमंत्री आहेत त्यांना त्यांचे काम करु द्या, आम्ही येथे सगळ्या लढाया लढण्यासाठी सक्षम आहोत.

योग्य वेळी मुख्यमंत्री समोर येतील आणि जेव्हा ते समोर येतील तेव्हा या तोफा, बॉम्ब यांच्यात काही दम नाही हे कळेल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या नेत्याने दिल्लीत यायला पाहिजे. महाराष्ट्राचा प्रभाव दिल्लीवर असायला हवा आणि त्यादृष्टीने विरोधी पक्षनेते येत असतील, तर त्यांचे स्वागत करायला हवे. काहीतरी कागद घेऊन आले आणि गृहसचिवांना भेटले अशा बातम्या पाहिल्या. तो कागद काही गंभीर नाही. विरोधी पक्षाच्या हातातील कागद गंभीर आहे की नाही हे सरकार ठरवणार. काडीचाही दम त्या अहवालात नाही. तो अहवाल जाहीर करावा, त्यात सरकारला अडचणीत आणेल, असे काही नाही. त्याची काय दखल घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेते तो जो काही बॉम्ब घेऊन आले होते, तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वातसुद्धा नव्हती. दिल्लीत कुठे स्फोट झाला, महाराष्ट्रात काही पडसाद उमटतात का आम्ही पाहत होतो. पण तसे काही दिसले नाही. महाराष्ट्र आणि दिल्लीत बंगालप्रमाणे ‘खेला होबे’ सुरु असल्यामुळे लोकांचे चांगले मनोरंजन होत असून त्यासाठी कोणता मनोरंजन टॅक्सही भरायची गरज नसल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.

काही चुकीचे झाले असेल तर महाराष्ट्रातील गृहखाते त्यासाठी सक्षम आहे, केंद्रात त्यासाठी येण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते हे निवडून आले आहेत. त्यांच्याकडील सगळा डाटा घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा केली तर महाराष्ट्राची भ्रत राहते. पण त्यात काही दम नसल्याने ते दिल्लीत आले. अशा प्रकारचे भिजलेले फटाके वारंवार वात लावून फोडण्याची दिल्लीला सवय आहे. याकडे आम्ही गंमत म्हणून पाहत आहोत. पुढचा सिनेमा तो कोणता तयार करत आहेत याकडे आम्ही पाहत असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

सगळा गोंधळ ज्या परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन सुरु आहे, त्यांच्याच आग्रहाखातर आपण महाराष्ट्रात सीबीआयवर बंदी घातली. तेच परमबीर सिंह आता सीबीआय तपासासाठी चालले आहेत. त्यात सीबीआय चौकशीसाठी येथे महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस येत आहेत. अनेक राज्याच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची अनेक पत्रे त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना लिहिली असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

The post यामुळे मुख्यमंत्र्यांनी फोन टॅपिंग प्रकरणी बाळगले आहे मौन – संजय राऊत appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3ciDv5Y
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!