महाराष्ट्र

एवढा कन्फ्युज मुख्यमंत्री पाहिला नाही, मनसेने आनंद महिंद्रांबाबतच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांना सुनावले!

Share Now

मुंबई – शुक्रवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. येत्या १ ते २ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्याचे देखील सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मात्र, पण मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांच्या एका ट्वीटवरून त्यांचे नाव न घेता सुनावले. यावरून अजूनपर्यंत खुद्द आनंद महिंद्रा यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली, तरी त्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुख्यमंत्र्यांवर आगपाखड करण्यात आली आहे.

शनिवारी दुपारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच, महाराष्ट्रात लॉकडाऊन लावणे कसे चुकीचे ठरू शकते, याविषयी देखील त्यांनी मत मांडले. तसेच, उद्योगपतींच्या सल्ल्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेचा समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की आरोग्य सुविधा उभारण्याचे सल्ले दिले, आम्ही त्यावर काम करतच आहोत. पण रोज ५० किमान डॉक्टर, आरोग्य सेवकांची सोय व्हावी. पण, कोरोनाकाळात असे आरोग्यसेवक स्वत:हून सरकारला मदत करण्यासाठी आले होते. पण करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच सरकारने त्या लोकांना कामावरून काढून टाकल्यामुळे पुन्हा ते कामावर आले, तर सरकार त्यांना काढून टाकणार नाही, याची काय खात्री आहे? लोकांच्या मनातील तुमच्याबद्दलची विश्वासार्हता कमी झाली आहे, म्हणून तुम्हाला डॉक्टर, आरोग्यसेवक मिळत नसल्याचे संदीप देशपांडे म्हणाले.

त्यांचे मी नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितले की लॉकडाऊन करायचा असेल, तर आरोग्य सुविधा वाढवा. ते आपण करतोच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवत आहोत. पण हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत, ज्या उद्योगपतींनी आरोग्य सुविधा वाढवायला सांगितले, त्यांना मी हात जोडून सांगू इच्छितो, की आरोग्य सुविधा आपण वाढवतच आहोत. पण कृपा करून रोज मला किमान ५० डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांची महाराष्ट्रात पुरवठा होईल, अशी काहीतरी सोय करा. कारण नुसते फर्निचरचे दुकान म्हणजे हॉस्पिटल नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते.

काही दिवसांपूर्वी एक ट्वीट करून लॉकडाऊनवर महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचे होते. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचे प्रमाण कमी करण्यावर काम करूया, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले होते.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावर देखील संदीप देशपांडे यांनी खोचक टीका केली. कोरोना गंभीर होत असताना लॉकडाऊन वाढवायचा नाही, तर काय करायचे? असा उलट प्रश्न मुख्यमंत्र्यांनी जनतेलाच विचारला आहे. शिवाय यावर ते आता तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. खरंतर एवढ्या संभ्रमित अवस्थेतला मुख्यमंत्री आजपर्यंत पाहिला नसल्याचे देशपांडे यावेळी म्हणाले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी केलेला संवाद होता की जनतेला धमक्या होत्या?, असा सवाल देखील देशपांडेंनी उपस्थित केला आहे.


Share Now
error: Content is protected !!