महाराष्ट्र

लॉकडाऊन काळात नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने एक दमडीही दिली नाही : फडणवीस

Share Now

नागपूर : देशात महाराष्ट्र असे एकमेव राज्य आहे ज्या राज्याने कोरोना काळात लॉकडाऊननंतर नागरिकांना मदत केली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर वेगवेगळ्या देशांनी घोषित केलेल्या मदतीच्या पॅकेजबाबत ट्विट करुन माहिती दिली होती.

त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे पॅकेज किंवा मदत ही केंद्र सरकारांनी केलेली आहे. आपले केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून अशी टीका केली होती. फडणवीस त्यावर बोलताना म्हणाले की, विस्मरणाचा जितेंद्र आव्हाड यांना रोग झाला आहे. वीस लाख कोटींचे पॅकेज केंद्र सरकारने दिले होते, पण महाराष्ट्र सरकारने एक पैसाही नागरिकांच्या मदतीसाठी दिला नसल्याचे फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जे भाषण केले, मला तर समजतच नाही की ते का केले. कारण त्यामध्ये कुठल्याही उपाययोजना नव्हत्या, कुठलेही निर्णय नव्हते. तज्ञांशी बोलू दोन दिवसानंतर सांगू असेच मुद्दे त्यांनी मांडले. लॉकडाऊन करताना त्याकाळात नागरिकांना कशा पद्धतीने मदत केली जाईल, हे सांगणे गरजेचे असल्याचे फडणवीस म्हणाले.

देशात पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन केला होता, तर प्रत्येक घटकातील नागरिकांची काळजी घेतली होती. त्यांच्यासाठी काही न काही उपाययोजना केल्या होत्या, प्रत्येक नागरिकांच्या घरी अन्नधान्य पोहोचेल अशी व्यवस्था केली होती. खात्यात पैसे जाईल, असे नियोजन केल्याचे फडणवीस म्हणाले. राज्य सरकारने पॅकेज न देता फक्त लोकांची वीज कापली लोकांना त्रास दिल्याचा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला.


Share Now
error: Content is protected !!