मराठवाडा

पुणे जिल्ह्यात काय सुरु, काय बंद?; जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले सुधारित आदेश

Share Now

म. टा. प्रतिनिधी, पुणेः पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधित दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून फक्त पार्सल सेवा तसेच व्यायाम शाळा, सलून आणि ब्युटी पार्लरच्या दुकानांमध्ये लसीकरण झालेल्या नागरिकांनाच प्रवेश, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ५० टक्के क्षमतेने सुरू, लग्न समारंभ केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील करोनाबाधितांचा दर (पॉझिटिव्हिटी रेट) आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेचे प्रमाण या निकषांवर पुणे जिल्ह्याचा समावेश अनलॉकच्या नव्या नियमांमध्ये चौथ्या गटामध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी देशमुख यांनी याबाबतचे सुधारित आदेश काढले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवांसंबंधित सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य दुकाने ही बंद ठेवण्यात येणार आहेत.

हॉटेल आणि रेस्टॉरंट यामधून फक्त पार्सल सेवा सुरू राहणार आहे. या दुकानांच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा सदर दुकानामधून सेवा घेणाऱ्या व्यक्ती यांना सायंकाळी पाचनंतर प्रवास करण्यास परवानगी असणार नाही.

शासन आदेशातील सूचनांनुसार ज्यावेळी ई-पासची आवश्यकता आहे. त्यावेळी वाहनात असणाऱ्या सर्व प्रवाशांना वैयक्तिक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही. करोना व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना १०० टक्के उपस्थितीसह सुरू राहतील. खाजगी कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. उद्याने, मैदाने हे सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vX2q6p
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!