मराठवाडा

करोनाबाधित माओवाद्याचा मृत्यू; उपचारासाठी निघाल्यानंतर पोलिसांनी केली होती अटक

Share Now

: करोना संक्रमित नेता, स्पेशल झोन कमिटीचा सदस्य गड्डम मधुकर उर्फ सोबरॉय याचं हैदराबादमध्ये उपचारादरम्यान आज पहाटे निधन झालं आहे. करोनावर उपचार घेण्यासाठी निघालेल्या सोबरॉय याला तेलंगणाच्या वरंगल जिल्ह्यात अटक करण्यात आली होती. बस्तरचे आयजी पी.सुंदरराज यांनी नक्षलवादी सोबरायच्या मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

करोनाबाधित माओवादी सोबरॉय याला उपचारासाठी जात असताना वाहन तपासणी दरम्यान १ जून रोजी तेलंगणाच्या वरंगल पोलिसांनी अटक केली होती. तेलंगणाच्या कोमरमभीम जिल्ह्यातील कोंडापल्ली गावचा रहिवासी असलेला माओवादी गड्डम मधुकर उर्फ सोबरॉय हा २२ वर्षांपासून नक्षलवादी कारवायांशी संबंधित होता.

अटक झाल्यानंतर त्याला कोविडच्या उपचारासाठी हैदराबादच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

गड्डम मधुकर उर्फ सोबरॉय हा अवघ्या १८ वर्षाच्या असताना शिक्षण अर्धवट सोडून माओवादी विचारसरणीकडे आकर्षित झाला होता. तो १९९९ मध्ये माओवादी संघटनेत सामील झाला. तत्कालीन ‘पीपल्स वॉर’च्या सिरपूर दलममध्ये सक्रिय होता. वरिष्ठांच्या निर्देशानंतर त्याला दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीमध्ये हलविण्यात आले. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांना ठार मारणे आणि शस्त्र हिसकावणे यासह अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. आज पहाटे हैदराबादच्या उस्मानिया रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर तेलंगाणा पोलिसांनी गड्डम मधुकर याच्या कुटुंबियांना माहिती दिली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SepLSn
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!