मराठवाडा

ठाण्यातील गोंधळाला अखेर पूर्णविराम; टाळे उघडण्यास प्रारंभ

Share Now

म. टा. प्रतिनिधी,

ठाणे जिल्ह्यातील शहरांच्या अनलॉकविषयी निर्माण झालेल्या गोंधळाला रविवारी दुपारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरांच्या आदेशानंतर पूर्णविराम मिळाला. परंतु राज्य शासनाकडून निर्देश देऊनही स्थानिक प्रशासनाकडून आदेश काढण्यात होत असलेली दिरंगाई आणि प्रशासकीय विसंवादाचे दर्शन यामुळे घडले. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आलेल्या आदेशावर ५ जूनची तारीख असली तरी हे आदेश नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी रविवार उजाडल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

राज्य शासनाने शनिवारी अनलॉक संदर्भातील नियमावली जाहीर करून करोना पॉझिटिव्हीटी दर आणि शहरातील ऑक्सिजन खाटांवरील रुग्णांचे प्रमाण यानुसार शहरांचे गट निश्चित केले. तसेच जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या मार्फत या संदर्भात सविस्तर नियमांचे आदेश काढण्याची सूचना दिली होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये आपण कोणत्या गटामध्ये याचा शोध सुरू झाला होता. ठाणे शहर पहिल्या गटात की, तिसऱ्या गटात यावरून गोंधळ सुरू झाला होता. त्यामुळे दिवसभर संभ्रमाचे वातावरण असल्याने नागरिकांना दुकाने उघडायची, की बंद करायची असा संभ्रम निर्माण झाला होता. अखेर ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी शनिवारी रात्री उशिरा काढलेले आदेश महापालिकांना पाठवण्यात आले. त्यानंतर रविवारी ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली शहरांसाठी स्वतंत्र नियमावली घोषित करण्यात आली. आज, सोमवारपासून ही नियमावली लागू होणार असली तरी त्याची माहिती देण्यामध्ये प्रशासनाकडून झालेल्या विलंबावरून नागरिकांकडून सातत्याने नाराजी व्यक्त होत आहे. लॉकडाउनचे नियम लागू करण्यापासून ते लॉकडाउन उठवण्यापर्यंत सर्वच स्तरांवर होणारी दिरंगाई संतापजनक असल्याची प्रतिक्रिया आस्थापने आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. पालघर जिल्ह्यातही असाच प्रकार झाल्याने तेथूनही संताप व्यक्त केला जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरांचे गट

दुसऱ्या गटातील शहरे : ठाणे, नवी मुंबई

तिसऱ्या गटातील शहरे : कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर, शहापूर, मुरबाड आणि ठाण्याचा ग्रामीण भाग.

मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने उघडणार

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई ही दोन शहरे दुसऱ्या गटामध्ये समाविष्ट असल्याने या शहरांमधील मॉल, एकपडदा चित्रपटगृहे, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने उघडण्यास परवानगी मिळाली आहे. सर्व आवश्यक आणि अनावश्यक वस्तू सेवांची दुकानेही नियमित सुरू ठेवता येणार आहेत. उपाहारगृहे देखील ५० टक्के क्षमतेने नियमित सुरू ठेवता येणार आहेत, तर सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने आणि सायकलिंगही नियमित करता येणार आहे. खासगी कार्यालये १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत खुली ठेवता येणार आहेत. इनडोअर खेळांना सकाळी किंवा संध्याकाळी ५ ते ९ ही वेळ देण्यात आली आहे. सार्वजनिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सभागृहाच्या ५० टक्के क्षमतेने आयोजित करता येणार आहेत. लग्नसमारंभासाठी सभागृहाच्या ५० टक्के, परंतु कमाल १०० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. बैठका, निवडणुका, स्थानिक प्रशासन, स्थायी समिती बैठक अशा सगळ्यांसाठी ५० टक्के क्षमतेचे बंधन घालून देण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील इतर शहरे तिसऱ्या गटात असल्याने तिथे मात्र मुंबईप्रमाणेच नियम लागू असणार आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3v2bVzQ
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!