मराठवाडा

नळाला पाणी, चांगल्या रस्त्यासाठी बेंबळी येथील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार–विविध समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी, सीईओंना दिले निवेदन

Share Now

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी

पाणीपुरवठा करणारे प्रकल्प तुडुंब भरलेले असतानाही नळाला पाणी येत नसल्यामुळे तसेच सव्वा कोटी रुपये खर्चून तयार केलेला रस्ता एका महिन्यातच उखडून गेल्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. बेंबळीतील छत्रपती शिवाजी चौक, टेकडी परिसर, धनगर गल्ली, अण्णाभाऊ साठे नगर परिसरामध्ये राहत असलेल्या ग्रामस्थांच्या घरातील नळाला पाणी येत नाही. सध्या रुईभर येथील तलावांमध्ये तसेच गावाच्या परिसरातील साठवण तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. तरीही या परिसरात पाईप लाईन मधील किरकोळ बिघाडामुळे पाणी येत नाही.

यामुळे अद्यापही येथील नागरिकांना पाणी वापरण्यासाठी तसेच पिण्यासाठी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे येथील नागरिक पूर्ण त्रस्त झाले आहेत. वास्तविक पाहता केवळ एक किंवा दोन दिवस काम करून पाईप लाईन मधील साठलेला गाळ काढला तर मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकते. परंतु, ग्रामपंचायत प्रशासनाच्या अनास्थेमुळे यासोबतच राजकीय मतभेद, उदासीनतेमुळे पाईप लाईन मधील किरकोळ गाळ काढण्याचे काम करण्यात आलेले नाही. तसेच शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी जीवन प्राधिकरण योजनेमधून बरमगाव ( बु.) येथे बांधण्यात आलेला जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मल्लिकार्जुन मंदिर परिसर या मेन रोडवर लॉकडाऊनच्या अगोदर सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून सिमेंट रस्ता बांधण्यात आला आहे.

परंतु हा रस्ता अत्यंत निकृष्ट पद्धतीने बांधण्यात आला आहे. रस्ता तयार झाल्यानंतर केवळ एका महिन्यातच रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. खडी व माती उघडी पडत आहे. सध्या रस्त्यावरून एखादे वाहन गेले तर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. दुचाकी चालक रस्त्यावरून घसरून पडून अपघात होत आहे.

धुळीमुळे वृद्ध व बालकांना श्वसनाचा त्रास होत आहे. तसेच रस्ता खोदकाम करून बांधण्यात न आल्यामुळे पावसाळ्यात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. यामुळे पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करणे, जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करणे, रस्त्याचे पूर्ण खोदकाम करून पुनर्बांधणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा ग्रामपंचायत निवडणुक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.


Share Now
error: Content is protected !!