मराठवाडा

कळंबकरांच्या मदतीसाठी धावला “ऑक्सिजन” ग्रुप

Share Now

कळंब (माझी बातमी ब्युरो) :
ऑक्सिजन ग्रुपच्या मदतीने कळंबकरांच्या सेवेत ऑक्सिजनयुक्त  रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे.
सध्या देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. अनेक जण ऑक्सिजन, बेड, उपचार अभावी मृत्यूमुखी  पडत आहेत. कळंबमध्ये तर अत्यवस्थ स्थितीत अँबुलन्स न मिळाल्याने एकाचा जीव गेला होता. नाईलाजाने त्या रुग्णाला त्याच्या मुलाला मोटारसायकलवर न्यावं लागलं होतं. पण वाटेतच त्या रुग्णाने जीव सोडला आणि त्याच्या मुलाने जिवाच्या आकांताने केलेल्या  प्रयत्नाला यश आले नाही. ही बाब ऑक्सिजन ग्रुपच्या सदस्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच नवीन अँबुलन्सचा शोध घेण्यास सुरुवात केली. तुळजाई प्रतिष्ठानचे शहाजी चव्हाण यांनी तात्काळ आपल्याकडील असलेली अँबुलन्स उपलब्ध करून दिली. गाडीला थोडी दुरुस्ती करणे गरजेचे होते. त्यासाठी देखील शहरातील दानशूर व्यक्ती पुढे आले. शहरातील टायर दुकानदार इस्माईल हांनुरे यांनी रुग्णवाहिकेसाठी मोफत टायर दिले.
तसेच मनोज मेकॅनिकल यांनी मोफत सर्विसिंग करून दिली तर तिरुपती बॅटरीचे मालक यांनी बॅटरी आणि मोटर वायरिंग उपलब्ध करून दिली.त्याचबरोबर दत्त कुशन यांनी सीट कव्हर आणि कुशन बसवून दिले. चालक म्हणून नितीन सावंत यांनी देखील लागलीच होकार दिला.अशाप्रकारे कळंबकरांच्या सेवेत ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका ऑक्सिजन ग्रुपच्या प्रयत्नाने उपलब्ध झाली आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर ही रुग्णवाहिका सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड काहीप्रमाणात नक्कीच थांबेल. यासाठी हर्षद अंबुरे, अकिब पटेल, चेतन कात्रे, अशोक काटे, सुशीलकुमार तीर्थकर, सुमीत बलदोटा, संदीप बावीकर, निलेश होनराव, शहाजी चव्हाण यांनी परिश्रम घेतले आहेत. सध्या ऑक्सिजन अभावी अनेक जण आपला जीव गमावत आहेत, मात्र ऑक्सिजन अभावी कोणाचेही जीव जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे या तरुणांनी सांगितले. म्हणून त्यांनी आपल्या ग्रुपचे नाव देखील 'ऑक्सिजन ग्रुप' ठेवले आहे. यापुढे देखील रुग्णांच्या मदतीसाठी काम करत राहणार असल्याचे या ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.

from माझी बातमी https://ift.tt/3aOBrRI
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!