मराठवाडा

महाराष्ट्राने दिल्लीची गुलामी कधीच पत्करली नाही; शिवसेनेने केंद्राला डिवचले

Share Now

मुंबई: ‘संकटाशी लढण्याची मोठी परंपरा हाच महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्राने कधीच स्वाभिमानासाठी तडजोड स्वीकारली नाही. महाराष्ट्रात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री व सरकार असल्याने दिल्लीचे आजचे पातशहा महाराष्ट्राची हरतऱ्हेने कोंडी करीत आहेत. पण महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील व विजयी होईल,’ असा जबरदस्त विश्वास व्यक्त करत शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारला टोला हाणला आहे. ( Slams Central Government)

महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्याच्या वाटचालीचा वेध घेतला आहे. आजच्या करोनाच्या संकटातही महाराष्ट्र ताठ कण्याने लढतो आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. करोना काळात महाराष्ट्रावर दिल्लीकडून होत असलेल्या अन्यायाचा उल्लेख करत शिवसेनेनं सध्याच्या केंद्र सरकारवरही टीकेची तोफ डागली आहे. ‘महाराष्ट्राचे करोनाचे लसीकरण दिल्लीच्या आडमुठेपणामुळे थांबले आहे. महाराष्ट्राला इंजेक्शन, औषधांचा पुरवठा नीट होत नाही. ज्या महाराष्ट्राने आर्थिक प्राणवायूचा पुरवठा देशाला केला, त्या महाराष्ट्राला आज प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रात काहीही करून राजकीय व आर्थिक गोंधळ निर्माण करून राज्य बदनाम करण्याचे कारस्थान सुरूच आहे. दिल्लीतील सरकारे बदलत राहिली तरी महाराष्ट्राशी वैर काही संपलेले नाही. महाराष्ट्राच्या हक्काचे व न्याय्य वाट्याचे काही मिळूच द्यायचे नाही. महाराष्ट्राला ओरबडायचे, त्याची लूट करायची हे धोरण मात्र सर्व काळात कायम राहिले,’ अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

वाचा:

‘महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प व योजना गुजरातला नेऊन ठेवल्या जात आहेत. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा व महाराष्ट्राची आर्थिक रसद तोडण्याचा हेतू यामागे आहे. पण संकटाशी लढण्याची मोठी परंपरा हाच महाराष्ट्राचा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पंडित नेहरू प्रतापगडावर आले, तेव्हा त्यांच्या समोर निधड्या छातीने महाराष्ट्र उभा राहिला होता. महाराष्ट्राला इतिहास आहे, म्हणून तो टिकला आहे. आज महाराष्ट्रावरचे संकट मोठे आहे. करोना विषाणूने मोठे आव्हान उभे केले आहे. शंभर वादळे, शंभर भूकंपांनी होणार नाही त्यापेक्षा जास्त पडझड एका विषाणूने केली. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील व विजयी होईल,’ असा विश्वासही शिवसेनेनं व्यक्त केला आहे.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gOZkg1
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!