मराठवाडा

पोल्ट्री फार्म परिसरात कारमध्ये सुरू होता बेकायदा प्रकार; पोलिसांनी धाड टाकली अन्

Share Now

अमरावती: तालुक्यातील बेनोडा येथील शिवारातील एका पोल्ट्री फार्म परिसरात कारमध्ये काही जण सामन्यांवर सट्टा घेत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील चारचाकी वाहन, रोकड आणि इतर साहित्य असा एकूण १२ लाख ३२ हजार ७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

एलसीबी पथकाने आकाश बाबाराव ब्राम्हणे, मुकुल शंकर गणोरकर, मनीष सुभाषराव खडसे आणि विशाल किसनराव ठाकरे (सर्व रा. जरुड) व अमोल पुंडलिक यावले, मंगेश विजयराव बिजवे, नीलेश साहेबराव वाकोडे (रा. वरुड) या आरोपींना अटक केली आहे. एलसीबीचे पीएसआय सूरज सुसतकर व त्यांचे पथक शनिवारी वरुड परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वावरुळी शिवारात मागील काही दिवसांपासून अमोल यावले हा त्याच्या काही सहकाऱ्यांसह एका कारमध्ये खेळत आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर एलसीबीचे पथक वावरुळी शिवारातील पोल्ट्री फार्म परिसरात गेले. त्यावेळी एका कारमध्ये अमोल यावले व त्याच्यासोबत इतर सहा जण हे आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळताना आढळून आले.

मोबाइलवर इतर व्यक्तींकडून सामन्यातील प्रत्येक चेंडूवर ते सट्टा घेत होते. त्यामुळे पोलिसांनी या सातही जणांना पकडले व त्यांच्याकडून १७ मोबाइल फोन, एक कार, २७ हजार ४५० रुपयांची रोकड, एक दुचाकी व इतर साहित्य असा एकूण १२ लाख ३२ हजार ७० रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सूरज सुसतकर, नीलेश डांगोरे, चेतन दुबे, स्वप्नील तंवर, दीपक सोनाळेकर, युवराज मानमोठे, अमित वानखडे, विनोद हीवरकर यांच्या पथकाने केली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uh1JUr
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!