धाराशिव – २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम मिळण्याकरीता 15 सप्टेंबर 2023 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.संबंधित शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याबाबत विमा कंपनीस आदेश दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी कळविले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थिती जसे की पूर,पावसातील खंड,दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आदी बाबींमुळे अधिसूचित महसूल मंडळातील अधिसुचित पिकांचे शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत 7 वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.

त्याअनुषंगाने हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे या बाबीअंतर्गत प्रातिनिधीक सूचकांच्या आधारे यापूर्वी 40 महसूल मंडळातील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम मिळण्याकरीता अधिसूचना काढण्यात आली होती.त्याचबरोबर उर्वरीत तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, कळंब तालुक्यातील कळंब,ईटकूर, मोहा,गोविंदपूर,वाशी तालुक्यातील वाशी,तेरखेडा,भूम तालुक्यातील अंभी,पाथ्रुड,माणकेश्वर,आष्टा,भूम, वालवड तर परंडा तालुक्यातील आसु, जवळा व पाचपिंपळा अशा एकूण 17 महसूल मंडळातील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना देखील उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम मिळण्याकरीता 15 सप्टेंबर 2023 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.संबंधित शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याबाबत विमा कंपनीस आदेश दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी कळविले आहे.