महाराष्ट्र लोकविकास मंचचा सामाजिक कार्यातील आधारस्तंभ पुरस्कार अनिताताई तोडकर यांना जाहीर.

2 Min Read

प्रत्येक यशस्वी पुरुषांच्यामागे एक महिला दडलेली असते. ती कधीही उजेडात येत नाही. घरातील पुरुषाला समाजात प्रतिष्ठा मिळाल्यानंतर सगळ्यात कुणाला आनंद होत असेल तर त्या महिलेला होत असतो. पण ती कधीही मी पणाचा आव आणत नाही. घरातील सर्व सदस्य, नातेवाईक, घरात येणारे पतीचे मित्रमंडळ यांचे हसतमुखाने स्वागत करून कुटुंबांला समाजात प्रतिष्ठा मिळवून देत असते. सौ. अनिताताई विश्वनाथ तोडकर या पर्याय संस्थेच्या जडणघडणीतील पडद्यामागच्या आदिशक्ती आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

तोडकर अण्णांना मोलाची साथ अनिताताईची मिळाली. त्या मुळेच या संस्थेशी जोडलेला माणूस आजपर्यंत तुटलेला नाही.मराठवाड्यात विश्वनाथ तोडकर अण्णांनी पर्याय संस्थेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात यांनी महिलांना स्वावलंबी करण्याचे मोठे काम उभे केले आहे. वीस ते पंचवीस हजार महिला या संस्थेशी जोडले गेले आहेत.

विश्वनाथ अण्णांचे पर्याय हे कुटुंब आहे. पण खऱ्या कुटुंबाकडे सामाजिक कामामुळे दुर्लक्ष होते. अशावेळी त्यांच्या अर्धांगिनी सौ.अनिताताई तोडकर या कुटुंबाबरोबर पर्यायच्या सर्व कार्यकर्त्यांची काळजी घेताना दिसतात. पर्याय बरोबर एकल, परित्यक्ता या महिला मोठ्या प्रमाणात जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे संस्थेमध्ये या महिलांची मोठी ये-जा असते. त्यांचे सुख-दु:ख, त्यांना आर्थिक मदतीबरोबरच संस्थेमधून उपाशी जाणार नाहीत, याची काळजी अनिताताई घेतात. त्यांची वहिनीसाहेब म्हणून ओळख आहे.

- Advertisement -

त्यामुळेच दरवर्षी महाराष्ट्र लोक विकास मंच, (मलोविम) या महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांच्या संघटनेमार्फत दिला जाणारा सामाजिक कार्यातील आधारस्तंभ पुरस्कार सौ. अनिताताई तोडकर यांना जाहिर करण्यात आलेला आहे. या करीता विविध स्तरांतुन अनिताताई यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Share This Article